ऍलोपॅथिक डाॅक्टर भासवून रुग्णांवर उपचार केला; ‘आयएमए’ची कारवाईची मागणी

आयुर्वेदिक डॉक्टर असूनही पेशंटला आपण ॲलोपॅथी डॉक्टर असल्याचे भासवून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या दोघा डॉक्टरांविरुद्ध कारवाई करा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन शेगाव शाखेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात आरोप असणारे डॉ. तुकाराम आढाव यांना विचारले असता त्यांनी सांगितले.

    शेगाव (Shegaon). आयुर्वेदिक डॉक्टर असूनही पेशंटला आपण ॲलोपॅथी डॉक्टर असल्याचे भासवून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या दोघा डॉक्टरांविरुद्ध कारवाई करा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन शेगाव शाखेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात आरोप असणारे डॉ. तुकाराम आढाव यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शासनाने वैद्यकीय व्यवसायासाठी जे नियम ठरवून दिलेले आहे, त्यांचे पालन करून तसेच सिव्हिल सर्जन यांची परवानगी घेऊन मी वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेले आरोप धादांत खोटे असून यामध्ये काहीही तथ्य नाही. आपल्याविषयी गैरसमज पसरवण्यात येत असल्याचे डॉ. आढाव यांनी सांगितले.

    आयएमए शेगाव शाखेने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारा जाहीर केल्यानुसार कोणत्याही पॅथीच्या डॉक्टरी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या दवाखान्याच्या बोर्डवर प्रिस्क्रिप्शनवर तसेच वेटिंग हॉल इथे ठळक अक्षरात स्वतःच्या पॅथीची डिग्रीबाबत सविस्तर माहिती लिहिणे आवश्यक आहे. शेगाव येथे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून डॉ. आढाव व डॉ. पटेल हे दोघे स्वतःला ॲलोपॅथी डॉक्टर म्हणून मिरवत आहेत. या प्रकरणी चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर डॉ. मोहन बानोले व इतरांची स्वाक्षरी आहे.