रेमडेसिवीरच्या किमती नियंत्रणात आणणार; पालकमंत्री डॉ. शिंगणे यांचे प्रतीपादन

कोविड रुग्णांची संख्या राज्यात सतत वाढत असल्याने कोविड-19 साथरोगाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. कोविड रुग्णांवरील उपचारासाठी प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या इंजेक्शनच्या किमती सामान्यांच्या आवाक्यात राहाव्या, 1500 रु. पर्यंत इंजेक्शन मिळू लागल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.

  बुलढाणा (Buldana).   कोविड रुग्णांची संख्या राज्यात सतत वाढत असल्याने कोविड-19 साथरोगाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. कोविड रुग्णांवरील उपचारासाठी प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या इंजेक्शनच्या किमती सामान्यांच्या आवाक्यात राहाव्या, 1500 रु. पर्यंत इंजेक्शन मिळू लागल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. त्यामुळे किमती नियंत्रणात आणण्यास प्राधान्य देत असल्याचे अन्न व औषधी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे.

  फेब्रुवारी 2021 पासून रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना औषधाची विक्री किंमत कमी करण्यात आली. परंतु छापील विक्री किंमत कमी करण्यात आली नाही. त्यामुळे विक्री किंमत कमी करण्यात आल्याचा लाभ रुग्णांना मिळाला नाही. उलट छापील किमतीनुसार आकारणी होत असल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड पडत असल्याचे दिसून आले. याची दखल घेऊन डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

  अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पडताळणी केली असता रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादकांनी औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना सुमारे 800 ते 1,300 रुपयांनी म्हणजे सरासरी 1,040/- रुपये किंमतीत केल्याचे आढळून आले. याबाबत रुग्णालयांनी रुग्णांना आकारलेल्या किमतीबाबत पडताळणी केली असता काही रुग्णालये त्यांच्या खरेदी किमतीवर 10 ते 30% अधिक रक्कम आकारून छापील किमतीपेक्षा कमी किमतीत रुग्णास उपलब्ध करीत आहेत. परंतु बहुतांश रुग्णालये खरेदी किंमत कमी असून देखील छापील किंमत आकारून मोठ्या प्रमाणावर नफा कमावत असल्याचे दिसून आले. याबाबत दखल घेऊन रेमडेसिवीर इंजेक्शनची उत्पादकांची विक्री किंमत व प्रत्यक्षात रुग्णांना आकारण्यात येणारी किंमत यामधील तफावत कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली.

  इंजेक्शनच्या किमती कमी होतील
  रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच इंजेक्शनची घाऊक व किरकोळ विक्री किमतीतील तफावत बघता जनहिताच्या दृष्टीने केंद्र शासनाने औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 अंतर्गत अधिकाराचा वापर करून रेमडेसिवीर इंजेक्शन अधिकतम किरकोळ विक्री किंमत निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव आयुक्तांनी राष्ट्रीय औषध किंमत नियंत्रण प्राधिकरण नवी दिल्लीला सादर केला आहे.

  रुग्णांना वेठीस धरू नका
  कोविडविषयक आणीबाणीची परिस्थिती पाहता संबंधित रुग्णालये तसेच विक्रेत्यांनी मानवतेच्या दृष्टीने विचार करून इंजेक्शनची किंमत आकारणे अपेक्षित आहे. रुग्णांवर नाहक भुर्दंड टाकणे योग्य नाही, अशांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही खाबुगिरांना देण्यात आला आहे.