5-G's Jangadgutta? Find out what will be the benefit for you

भारतात मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या सध्या ५ जी सेवा कशी पुरवता येईल यावर अभ्यास करत आहेत. तसेच अनेक क्षेत्रांत याबाबत चाचण्याही केल्या जात आहे. तसेच सरकारच्या दुरसंचार विभागाकडून ५-जी सेवेसाठी ५जी स्पेक्ट्रम लिलावाची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.

रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी नुकत्याच झालेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये असे जाहीर केलं आहे की, येत्या २०२१ च्या उत्तरार्धात भारतात ५-जी सेवा सुरू करू. त्या अनुषंगाने कामे वेगाने सुरु आहेत. परंतु ५-जी म्हणजे (What is 5-G) नक्की काय आणि त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे. हे सारे आपण जाणून फार गरजेचे आणि माहितीपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी आपण २-जी, ३-जी, ४-जी म्हणजे नेमकं काय? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

चला तर जाणून घेऊया २-जी, ३-जी, ४-जी म्हणजे नेमकं काय?

सगळ्यात आधी हे २-जी, ३-जी, ४-जी आणि आताचे ५-जी काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. खरं तर या अत्यंत तांत्रिक बाबी आहेत; पण आपण मोबाईल फोनचा इतका वापर करतो की, त्यातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे.

या सगळ्याची सुरुवात साधारणपणे १९७० च्या दशकात झाली. म्हणजे सगळ्यात आधी १-जी तंत्रज्ञानाचा शोध लागला. यातील ‘जी’ चा फुल फॉर्म आहे ‘Generation.’ म्हणजेच सत्तरच्या दशकात फोन सिग्‍नलसाठी लागणार्‍या पहिल्या जनरेशनच्या तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि त्यानंतर प्रत्येक दशकात हा आकडा २-जी, ३-जी, ४-जी आणि आता ५-जी असा वाढत गेला. आपला म्हणजे भारतीयांचा या ‘जी’शी संबंध आला ते ‘२-जी’ घोटाळ्यामुळे. १-जीमध्ये अ‍ॅनालॉग सिग्‍नलचा वापर केला जात असे. नंतर २-जी आलं तेव्हा हेच सिग्‍नल डिजिटल रूपात वापरले जाऊ लागले. आता चाळिशीत असलेल्या लोकांना अगदी सहज समजू शकेल असा बदल म्हणजे, पूर्वी आपण आपल्या लँडलाईनवरून फोन लावायचो तेव्हा फोन लागेपर्यंत आपल्या इअर पिसमधून कडकट्ट कडकट्ट असा आवाज यायचा; पण तेच फोन जेव्हा डिजिटल सिग्‍नल वापरू लागले तेव्हा कधी तरी टुँ टुँ असा आवाज येत असे किंवा फोन थेट लागायलाच सुरुवात झाली. हाच १-जी आणि २-जीमध्ये फरक आहे. कडकट्ट आवाजाला फोन १-जी तंत्रज्ञानावर चालायचा, तर टुँ टुँ आवाजाचा फोन हा २-जी तंत्रज्ञानाचा उपयोग करतो.

थोडक्यात काय, तर फोन सिग्‍नलची ताकद आणि गती यांच्यात या प्रत्येक बदलणार्‍या ‘जी’प्रमाणे वाढ होत गेली. नव्वदच्या दशकाच्या शेवट ३-जी चालू झालं आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी ४-जी चालू झालं. यादरम्यान मोबाईल सिग्‍नल कसे ताकदवान होत गेले आणि इंटरनेटचा वेग कसा वाढत गेला, याचा आपल्या सगळ्यांना अनुभव आहेच. आता तर भारतात ४-जी नेटवर्क जवळपास सगळीकडे उपलब्ध आहे आणि जिथे जिथे चांगली रेंज असते तिथे तिथे आपण अगदी सहज यूट्यूबवर किंवा प्राईम आणि अ‍ॅमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्म्सवर व्हिडीओज् बघू शकतो किंवा व्हिडीओ कॉल्सही करू शकतो.

एवढं सगळं असताना, ५-जीमध्ये अजून काय सुधारणा करायचा प्रयत्न केलाय?

वर उल्लेख केल्याप्रमाणे, ‘जिथे रेंज चांगली आहे तिथे’ ही अडचण प्रामुख्याने टाळायचा प्रयत्न ५-जी तंत्रज्ञानामध्ये केला आहे. ५-जी तंत्रज्ञानामुळे रेंज जास्तीत जास्त ठिकाणी चांगली असेल. कुठलेही कारण नसताना इंटरनेटचा स्पीड कमी होण्याचं प्रमाण कमी करायचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच मोबाईल सिग्‍नलची शक्‍ती एकसमान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

दुसरी महत्त्वाची सुधारणा म्हणजे, ‘लेटन्सी’ कमी करायचा प्रयत्न ५-जीमध्ये केला आहे. आता ‘लेटन्सी’ म्हणजे काय, तर आपण जेव्हा कुठलीही वेबसाईट बघण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ती वेबसाईट किंवा व्हिडीओ लोड होण्यासाठी काही वेळ लागतो. हा वेळ कशामुळे लागतो, तर आपला मोबाईल इंटरनेटवरून आपल्याला हव्या असलेल्या वेबसाईटच्या सर्व्हरला सिग्‍नल पाठवतो आणि तो सर्व्हर उत्तरादाखल आपल्याला हवी असलेली वेबसाईट किंवा व्हिडीओ पाठवतो. या गोष्टीला लागणारा जो वेळ आहे त्याला ‘लेटन्सी’ असं म्हणतात. म्हणजेच आपण काही वेळा वेबसाईट अजून लोड होतीये किंवा व्हिडीओ अजून बफर होतोय, असं बोलतो किंवा ऐकतो ते ५-जीमध्ये बंद करायचा प्रयत्न केला आहे. अगदी अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर सध्या आपल्याला मोबाईलवर जास्तीत जास्त १० ते १५ एमबीपीएस (दर सेकंदाला १० ते १५ मेगा बाईटस्) एवढा इंटरनेटचा स्पीड मिळतो, तो ५-जी आल्यावर कमीत कमी १ जीबीपीएस (दर सेकंदाला १ गिगाबाईट) एवढा जास्त मिळू शकेल, म्हणजे जवळपास सध्याच्या पेक्षा दहापट ते शंभरपट जास्त.

५-जीचे फायदे काय आहेत?

५-जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड जबरदस्त वाढेल आणि त्यावर अवलंबून असलेल्या सर्व सेवासुविधांची एफिशिअन्सीसुद्धा काही पटीने वाढेल. ई-लर्निंग, मशिन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, शेती, रिमोट मेडिसीन, वाहतूक तसेच करमणूक क्षेत्रातील संधी आणि सुविधादेखील झपाट्याने वाढतील. याचप्रमाणे व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (VR), ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी (AR) आणि एक्स्टेंडेड रिअ‍ॅलिटी (XR) सारखी तंत्रज्ञानं छोट्या डिव्हाईसेसवर सामान्य लोकांना उपलब्ध होतील. कुठल्याही तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केल्यास मनुष्याच्या फायद्याच्या अनेक गोष्टी निर्माण होतात.

५-जी तंत्रज्ञानातल्या अडचणी

५-जी तंत्रज्ञान हे हाय रेडिओ फ्रिक्‍वेन्सीवर चालतं. फ्रिक्‍वेन्सी जेवढी हाय तेवढी त्याची पेनिट्रेशनची क्षमता कमी होते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जास्त अँटेनाज् लावायला लागतील. ५-जी तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे मोबाईल फोन किंवा इतर डिव्हाईसेस घ्यावे लागतील. सुधारित इंटरनेट स्पीडमुळे चांगली बॅटरी लाईफ असणारे डिव्हाईसेस घ्यावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तंत्रज्ञानाचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी लागणारी आर्थिक गुंतवणूक ही बर्‍यापैकी जास्त आहे.

जगभरात कुठे कुठे ५-जी तंत्रज्ञान वापरलं जातं?

दक्षिण कोरिया, अमेरिका, चीन, जपान या देशांमध्ये तसेच स्वीडन, तुर्कस्तान, इस्टोनियासारख्या लहान देशांमध्येपण ५-जी नेटवर्क लोकांच्या वापरासाठी उपलब्ध आहे.

५-जीमधील धोके

चीन हा ५-जीसाठी लागणार्‍या इक्‍विपमेंटस्चा मोठा उत्पादक आहे. हुवाई ही त्यातली एक मोठी चिनी कंपनी आहे. परंतु, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपियन देशांना चिनी कंपन्या हेरगिरीसाठी या इक्‍विपमेंटस्चा वापर करतात, अशी शंका आल्याने त्यांनी चिनी ५-जी इक्‍विपमेंटस्च्या वापरला बंदी घातली आहे. काही युरोपिय देशांनी आता नोकिया किंवा एरिक्सन या कंपन्यांना हे काम दिलं आहे.

भारतात ५-जी नेटवर्क कधी चालू होणार?

भारतात मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या सध्या ५ जी सेवा कशी पुरवता येईल यावर अभ्यास करत आहेत. तसेच अनेक क्षेत्रांत याबाबत चाचण्याही केल्या जात आहे. तसेच सरकारच्या दुरसंचार विभागाकडून ५-जी सेवेसाठी ५जी स्पेक्ट्रम लिलावाची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु येत्या २०२१ च्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत या लिलाबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. अशा चर्चा होत आहेत. येत्या २०२१ मध्ये ५जी सेवा सुरु करणार असल्याची घोषणा रिलायन्स जिओचे प्रमुख मुकेश आंबानी यांनी दिली आहे. जिओ आणि क्वालकॉम सोबत यावर काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच इतर कंपन्याही एकत्र येत ५जी सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.