इंधनाच्या विक्रीत 7% घट; विमान इंधनाला बसला जबर फटका

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या विविध भागांमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध, तर काही राज्यांमधील लॉकडाऊनमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे फारशी उलाढाल झालेली नव्हती. त्यामुळे एप्रिल 2019 च्या तुलनेत यंदाच्या विक्रीमध्ये सात टक्क्यांनी कपात झालेली दिसून येत आहे.

    दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या विविध भागांमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध, तर काही राज्यांमधील लॉकडाऊनमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे फारशी उलाढाल झालेली नव्हती. त्यामुळे एप्रिल 2019 च्या तुलनेत यंदाच्या विक्रीमध्ये सात टक्क्यांनी कपात झालेली दिसून येत आहे.

    एलपीजीची विक्रीही घटली

    एप्रिल 2021 मध्ये देशातील पेट्रोलची विक्री 21.04 लाख टनांची राहिली आहे. ऑगस्ट, 2020 नंतरची ही सर्वांत कमी विक्री आहे. मार्च महिन्यामध्ये झालेल्या विक्रीशी तुलना करता 6.3 टक्क्यांनी विक्री कमी झालेली दिसून येत आहे. एप्रिल 2019 मधील विक्रीच्या तुलनेत यंदा पेट्रोलची विक्री 4.1 टक्क्यांनी कमी झाली आहे. एप्रिल 2020 मध्ये देशात केवळ 8 लाख 72 हजार टनांची पेट्रोल विक्री झाली होती. वाहनांसाठी सर्वाधिक वापरले जाणारे इंधन असलेल्या डिझेलची विक्री ही एप्रिलमध्ये केवळ 50.9 लाख टनांची झाली. मार्च महिन्याच्या तुलनेत ती1.7 टक्के, तर एप्रिल 2019 च्या तुलनेत 9.9 टक्क्यांनी कमी झाली आहे.2020 एप्रिमध्ये केवळ 28.40 लाख टन डिझेलची विक्री झाली होती. दरम्यान, मार्च महिन्याच्या तुलनेत द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (एलपीजी)ची विक्री 3.3 टक्क्यांनी कमी होऊन 21 लाख टनांवर आली आहे. एप्रिल 2019 मध्ये एलपीजीची विक्री18.8 लाख टन झाली होती. त्या तुलनेत एप्रिलमध्ये 11.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

    विमान इंधनाला बसला जबर फटका

    विमानासाठी लागणाऱ्या इंधनामध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षभरापासून विमानसेवा मोठ्या प्रमाणात बंद असल्यामुळे ही घट झाली आहे. एप्रिलमध्ये हे इंधन 3 लाख 77हजार टन विकले गेले. मार्च महिन्यापेक्षा त्यात 11.5 टक्के, तर एप्रिल 2019 पेक्षा 39.1 टक्क्यांची घट नोंदविली गेली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यामध्येच इंधनाच्या खपामध्ये घट व्हायला प्रारंभ झाला होता. मात्र, पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारांमुळे इंधनाच्या खपामध्ये फारशी घट दिसून आली नाही.