after diwali the idea of buying air india came in the office when the financier is ready hope will arise employees will also give 1 1 lakh

या वर्षीची दिवाळी तर साजरी करतोय पण पुढल्या दिवाळीला काय स्थिती असेल, कर्माचाऱ्यांचं काय होणार, काहीच सांगता येणार नाही अशी चर्चा रंगली होती.

६९ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्जाच्या गर्तेत सापडलेल्या सरकारी एअरलाइन्स कंपनीला काही प्रमाणात दिलासा देणारा आशेचा किरण दिसू लागला आहे. ही अभिमानाचीच गोष्ट म्हणावी लागेल कारण काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांनीच एकत्र येत ही कंपनी विकत घेण्याचा विडा उचललाय. हे कर्मचारी खासगी इक्विटी फर्म सोबत सरकारी लिलावात भाग घेण्याच्या तयारीला लागले आहेत. जर सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर देशाच्या इतिहासातील हे पहिलं असं प्रकरण असणार असून सरकारी कंपनी तिचेच कर्मचारी खरेदी करणार आहेत.

बसल्या बसल्या आला डोक्यात विचार

कंपनीचे तारणहार असणारे वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनंतर एअर इंडियाच्या मुख्यालयात चार-पाच सहकारी बसले होते. सर्वजण येथे गेल्या ३०-३२ वर्षांपासून नोकरी करतायेत. या वर्षीची दिवाळी तर साजरी करतोय पुढल्या दिवाळीला काय स्थिती असेल, कर्माचाऱ्यांचं काय होणार, काहीच सांगता येणार नाही अशी चर्चा रंगली होती.

जॉईनिंगच्या पहिल्याच दिवसाचे अनुभव सांगता सांगता सर्वच्याच भावनांना धुमारे फुटत होते. तेव्हा एक अधिकारी म्हणाला, ज्या एअरलाईन्समध्ये अख्खं आयुष्य गेलं, जर आपणच ही विकत घेतली तर? यावर एक अधिकारी म्हणाला, एवढी मोठी रक्कम आणायची कुठून? तेव्हा अशी कल्पना पुढे आली की, एखादा भांडवल पुरवठादार शोधून कर्मचाऱ्यांनीच ती विकत घ्यायची. पण या कल्पनेवर सगळेच गंभीर झाले.

झाली भांडवल पुरवठादाराची शोधाशोध सुरू

आमच्या या विचारांना आता खऱ्या अर्थाने चालना मिळाली होती. आम्ही भांडवल पुरवठादाराची शोधाशोध सुरू केली असं हे अधिकारी सांगतात. एकाचा नावावर शिक्कामोर्तबही झालं. खासगी कंपनी आमच्या या प्रस्तावाला राजीही झाली. यानंतर एअर इंडियाच्या अशा कर्मचाऱ्यांची निवड झाली, ज्यांच्या नोकरीची ३० ते ३२ वर्ष पूर्ण झाली आहेत. जुन्या कर्मचाऱ्यांचे कंपनीशी असलेले ऋणानुबंध असेच कायम रहावेत हेच यामागचं लॉजिक होतं.

एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जुने कर्मचारी अशा पद्धतीने पूर्णपणे या प्रक्रियेत सहभागी होतील. या मोहिमे अंतर्गत २०० हून अधिक कर्मचारी सहभागीही झाले आहेत. सर्वजण एक-एक लाख रुपये जमविण्याचा प्रयत्न करत आहेत. एअर इंडियात आजमितीला एकूण १४ हजार कर्मचारी आहेत. कंपनीकडे आजही तीच क्षमता असल्याचं या मोहिमेत सहभागी झालेल्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. सर्व गोष्टी ठीक झाल्या तर कंपनीचा गाडा रुळावर यायला काहीच हरकत नाही.

५१ टक्के भाग भांडवल एअर इंडियाच्याच कर्मचाऱ्यांकडे राहणार

लिलावाची संपूर्ण प्रक्रिया व्यावसायिक अध्यक्ष मिनाक्षी मलिक यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्यात येत आहे. कंपनीचे अधिकारी १४ डिसेंबरला संपणाऱ्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. पात्रताधारक बोली लावणाऱ्यांबाबत २८ डिसेंबरपर्यंत माहिती मिळणार आहे. ही योजना यशस्वी झाली तर कर्मचारी व्यवस्थापन कन्सोर्टियमकडे एअरलाईन्सचे ५१ टक्के भागभांडवल राहिल, तर भांडवल पुरवठादाराकडे ४९ टक्केच भाग असणार आहे.