Ampere Vehicles चा लीज प्रोग्राम,१११० रुपयांत घरी आणा नवी इलेक्ट्रिक स्कूटर

Ampere Vehicles ने व्हेइकल लीज स्टार्टअप OTO Capital सोबत भागीदारीत लीज प्रोग्राम सादर केला आहे. या अंतर्गत आपण मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या EMI हून कमी किंमतीत अँपिअरची इलेक्ट्रिक स्कूटर खरोदी करू शकता.

मुंबई : कोरोना विषाणूमुळे ऑटोमोबाइल उद्योगही मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला आहे. विक्रीला गती देण्यासाठी कंपन्या अनेक प्रकारच्या ऑफर्स देत आहेत. आता इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता Ampere Vehicles ने लीज प्लान आणला आहे. या अंतर्गत कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर प्रति महिना १,११० रुपये भरून आपण घरी आणू शकता.

अँपिअर इलेक्ट्रिकने व्हेइकल लीज स्टार्टअप OTO Capital सोबत भागीदारीत लीज प्रोग्राम सादर केला आहे. या अंतर्गत आपल्याला बाजाराभावाहून कमी किमतीच्या EMI वर स्कूटर खरेदी करता येणार आहे. उदा. अँपिअर V48 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 34,249 रुपये असून याचा मासिक हफ्ता 1,610 रुपये आहे. जर ही स्कूटर आपण या प्रोग्राम अंतर्गत खरेदी केली तर यासाठी आपल्याला दर महिन्याला 1,110 रुपयेच द्यावे लागतील.

अशाप्रकारे अँपिअरची झील इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्यानंतर याचा मासिक हफ्ता 3,020 असेल, तर लीजवर खरेदी केल्यास यासाठी दर महिन्याला 2,220 रुपयेच भरावे लागतील.

लीजवर अशी मिळणार अँपिअरची इलेक्ट्रिक स्कूटर

अँपिअरची इलेक्ट्रिक स्कूटर लीजवर विकत घेण्यासाठी OTO Capital च्या वेबसाइटवर किंवा थेट डिलरच्या माध्यमातून बुक करता येणार आहे. 

ग्राहक डिलरकडून स्कूटर विकत घेऊ शकतो किंवा होम डिलेवरीही घेऊ शकतो. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ४८ तासांनंतर ग्राहकाला त्याची स्कूटर मिळेल असा कंपनीने दावा केला आहे. 

१ ऑगस्टपासून सुरू होणार लीज प्रोग्राम 

अँपिअर इलेक्ट्रिक स्कूटरसाठी लीज प्रोग्राम १ ऑगस्टपासून बेंगळुरु येथून सुरू होणार आहे. यानंतर या वर्षाच्या अखेरीस ही सुविधा पुणे, हैद्राबाद, दिल्ली, चेन्नई, आणि कोचीनमध्येही सुरू करण्यात येणार आहे.

झील इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये

ग्रीव्स कॉटनच्या मालकी हक्काची कंपनी असलेल्या अँपिअर व्हेइकल्सने मे 2019 मध्ये झील इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती. हिचा टॉप स्पीड ताशी ५५ किमी आहे. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 75 किमी अंतर कापणार आहे असा कंपनीचा दावा आहे. याची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी ५.५ तासांचा कालावधी लागतो.

मॅग्नस प्रो स्कूटर अलीकडेच झाली लाँच

अँपिअरने अलीकडेच मॅग्नेस प्रो इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. याची किंमत ७३,९०० रुपये आहे. ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्ज असल्यास ईको मोडवर 100 किमी तर क्रूज मोडवर 80 किमीपर्यंत चालेल असा कंपनीने दावा केला आहे.