bitcoin

कोरोनाचे संकट असतानाही दररोज नवनवे उच्चांक गाठणाऱ्या क्रिप्टो करन्सीला आता उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. विविध प्रकारच्या आभासी चलनांच्या मूल्यात प्रचंड घसरण झाली असून याचा मोठ्या गुंतवणूकदारांना जबर फटका बसला आहे. जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या बिटकॉइन या आभासी चलनात सलग दुसऱ्या सत्रात मोठी घसरण झाली आहे.

  लंडन : कोरोनाचे संकट असतानाही दररोज नवनवे उच्चांक गाठणाऱ्या क्रिप्टो करन्सीला आता उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. विविध प्रकारच्या आभासी चलनांच्या मूल्यात प्रचंड घसरण झाली असून याचा मोठ्या गुंतवणूकदारांना जबर फटका बसला आहे. जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या बिटकॉइन या आभासी चलनात सलग दुसऱ्या सत्रात मोठी घसरण झाली आहे.

  बिटकॉइनचे मूल्य रविवारी 13 टक्क्यांनी घसरले. गेल्या वर्षाच्या तुलनेत बिटकॉइनचे मूल्य 50 टक्क्यांनी कमी होऊन ते 32601 डॉलरवर आले आहे. याआधी 14 एप्रिल रोजी बिटकॉईनने 64895 डॉलरची विक्रमी पातळी गाठली होती.

  आठवडाभरात यात गुंतवणूक करणाऱ्यांचे 748 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. बिटकॉईनबरोबरच इतर आभासी चलनांमध्ये देखील मोठी पडझड झाली आहे. इथेरियम या दुसऱ्या लोकप्रिय आभासी चलनात रविवारी 11 टक्के घसरण झाली आहे. याशिवाय डोजेकॉईन 7 टक्क्यांनी घसरला आहे. रिप्पल 13.64 टक्के आणि कार्डानो 13.77 टक्क्यांनी घसरला आहे. क्रिप्टो करन्सीच्या बाजार मूल्यात देखील मोठी घट झाली आहे.

  एका आठवड्यात जगभरातील 7459 क्रिप्टो करन्सीचे बाजार मूल्य 33 टक्क्यांनी कमी झाले आहे. आठवडाभरात बाजार मूल्य 748 अब्ज डॉलरने कमी झाले आहे. 16 मे 2021 रोजी क्रिप्टो करन्सीचे एकूण बाजार मूल्य 2.25 लाख कोटी डॉलर होते. मात्र आठवडाभरात झालेल्या मोठ्या पडझडीनंतर आता क्रिप्टो करन्सीचे बाजार मूल्य 1.5 लाख कोटी डॉलर इतके खाली आले आहे. या आठवडाभरात बिटकॉईन 27 टक्के, इथेरियम 46 टक्के आणि डोजेकॉईन 39 टक्क्यांनी घसरले आहेत.

  काही महिन्यांपूर्वी टेस्ला कंपनीचे प्रमुख आणि जगातील सर्वधिक श्रीमंत असलेल्या एलन मस्क यांनी ‘बिटकॉईन’मध्ये 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती. त्यानंतर जगभरात बिटकॉईनचे मूल्य प्रचंड वाढले होते. 2021 मध्ये बिटकॉईनच्या मूल्यात 75 टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. मार्च 2020 मध्ये बिटकॉईनचे मूल्य 5000 डॉलरच्या आसपास होते.

  कोरोना संकटात डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच बिटकॉईनने 20 हजार डॉलरची पातळी ओलांडली होती. सोने दरात होत असलेली घसरण आणि अस्थिरता यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मार्ग बिटकॉईनकडे वळवला आहे. त्यामुळे बिटकॉईनने गगन भरारी घेतली होती. गेल्या महिन्यात बिटकॉईन 64 हजार डॉलरवर गेला होता. मात्र बड्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेणे, कायदेशीर मान्यतेबाबत संभ्रम यामुळे निर्माण झालेली अनिश्चितता याचा मोठा फटका आभासी चलनांच्या बाजारपेठेला बसला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.