BSNL चा १४७ रुपयांचा नवा प्लान, मिळणार १० जीबी डेटा

बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी १४७ रुपयांचा नवा प्लान आणला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना ३० दिवसांची वैधता आणि १०जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे.

मुंबई : बीएसएनएल कंपनीने आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी 147 रुपयांचे नवीन वाउचर आणले आहे. चेन्नई सर्कलमध्ये आणलेल्या या वाउचरमध्ये अन्य सुविधांसह 10GB डेटा देण्यात येणार आहे. कंपनीने नवीन प्लान व्यतिरिक्त काही वाउचर्सवर अतिरिक्त वैधताही ऑफर केली आहे. बीएसएनएलने काही वाउचर्स बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे, ज्यात पतंजली प्लानचाही समावेश आहे. युजर्सला नवीन प्लान आणि अतिरिक्त वैधतेचा फायदा १ ऑगस्ट २०२० पासून मिळणार असून हटविण्यात आलेले प्लान्स ३१ जुलैपासून बंद करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

147 रुपयांच्या प्लानमध्ये काय मिळणार

या प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल व एसटीडी कॉलिंग मिळेल. याशिवाय ग्राहकांना 10 जीबी डेटा मिळेल. प्लानची वैधता ३० दिवस आहे, ज्यात BSNL ट्युन्सची सुविधा मोफत मिळणार आहे. हा प्लान तूर्तास फक्त चेन्नई सर्कलसाठी लागू करण्यात आला आहे.

या प्लान्सवर वाढली वैधता

१ ऑगस्टपासून ३१ ऑगस्ट दरम्यान 1999 रुपयांच्या प्लानचा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 74 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले. प्लानमध्ये 365 दिवसांची वैधता मिळणार आहे. यात ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे. अतिरिक्त वैधता मिळाल्यानंतर ग्राहकांना आता 439 दिवस हा प्लान वापरता येणर आहे. याशिवाय कंपनीने 247 रुपयांच्या प्लानची वैधता ६ दिवसांनी वाढविली आहे. यात ३० दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे.

247 रुपयांच्या प्लानमध्ये आता Eros Now सर्व्हिसेसचा ॲक्सेसही मिळणार आहे. अशाप्रकारे 81 दिवसांची वैधता असलेल्या 429 रुपयांच्या प्लानसोबतही Eros Now सर्व्हिसचा ॲक्सेस मिळेल असे कंपनीने स्पष्ट केले.