Weibo आणि Baidu ॲप्स झाले बॅन, आणखी काहींवर येणार ही वेळ

भारताने चीनला जोरदार घटका देत आणखी दोन मोठे ॲप Weibo आणि Baidu Search बॅन केले आहेत. हे दोन ॲप्स आता गुगल प्ले स्टोर आणि ॲपल ॲप स्टोरमधूनही हटविण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली : भारत सरकारने चीनचे दोन सर्वाधिक लोकप्रिय ॲप Baidu Search आणि Weibo ब्लॉक केले आहेत. बायडू सर्च चीनचे स्वत:चे सर्च इंजिन असून ते काही प्रमाणात गुगलसारखेच काम करते. तर विबोला चीनचे ट्विटर म्हटले जाते. बॅन केल्यानंतर आता हे दोन्ही ॲप गुगल प्ले स्टोर आणि ॲपल ॲप स्टोरमधूनही हटविण्यात येणार आहेत. हे दोन्ही त्या ४७ ॲप्समध्ये समाविष्ट होते, जे सरकारने २७ जुलैला बॅन केले आहेत.

जगभरात विबोचे ५० कोटी युजर

विबो हे चीनच्या सीना कॉर्पोरेशनने २००९  मध्ये लाँच केले होते. जगभरात विबोचे ५० कोटी युजर्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विबोच्या एका स्टार युजरपैकी एक आहेत. मोदींनी चीनच्या या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर २०१५ साली आपल्या चीन दौऱ्यावर जाण्याआधी अकाउंट उघडले होते. मोदी यांनी विबोवर आपल्या सर्वात पहिल्या पोस्टमध्ये विबोच्या माध्यमातून चीनमधील जनतेशी संवाद साधणार असल्याचे म्हटले होते.

बायडूचे प्लान फसले

बायडू बाबत सांगायचं झालं तर हे ॲप भारतात आपले पाय घट्ट करण्यासाठी धडपडत होते. बायडूचा  Facemoji कीबोर्ड खूपच लोकप्रिय आहे. कंपनीचे सीईओ रॉबिन ली हे भारतीय युजर्सने वापर वाढवावा यासठी याच वर्षी जानेवारीत आयआयटी मद्रास येथे दौऱ्यावर आले होते. आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मोबाइल कंप्युटिंगच्या क्षेत्रात भारतीय टेक्नॉलॉजी इंस्टिट्यूशन्ससोबत मिळून काम करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली होती.

ॲप स्टोरमधून हटविणार हे दोन्ही ॲप

सरकारने हे दोन्ही ॲप गुगल प्ले स्टोर आणि ॲपल स्टोरमधूनही हटविण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच देशातील इंटरनेट सेवा पुरवठादारांना हे ॲप ब्लॉक करायला सांगितले आहेत अशी माहिती सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली आहे.

२५० हून अधिक ॲप्सवर आहे लक्ष

२५० आणखी चायना ॲप्स भारत सरकारच्या रडारवर असून भविष्यात हेही बॅन होणार आहेत अशाही बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या आहेत. यात सर्वाधिक लोकप्रिय गेम PUBG चाही समावेश आहे. सरकार सध्या या ॲप्सची खातरजमा करत आहे अशीही माहिती समोर आली आहे. याच्या काम करण्याच्या पद्धतीत काही संशयास्पद आढळून आलं तर काही आठवड्यांतच आणखी काही चीनी ॲप्स बॅन झाल्याची बातमी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.