विमा दाव्यांमध्ये महिन्याभरात २४० टक्के वाढ

देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असून १ ऑगस्ट रोजी ही संख्या १७ लाख ५० हजारांवर पोहोचली. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विमा कंपन्यांकडे एकल आरोग्य विम्यासह कोरोना उपचारांसाठीच्या दाव्यांमध्ये गेल्या महिन्यापेक्षा २४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबई : देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असून १ ऑगस्ट रोजी ही संख्या १७ लाख ५० हजारांवर पोहोचली. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विमा कंपन्यांकडे एकल आरोग्य विम्यासह कोरोना उपचारांसाठीच्या दाव्यांमध्ये गेल्या महिन्यापेक्षा २४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जुलैच्या अखेरच्या आठवड्यात ७१ हजार ४२३ जणांनी कोरोना उपचारासाठी विमा कंपन्यांकडे ११४५.८७ कोटी रुपयांचे दावे केले आहेत, असे सामान्य विमा परिषदेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. २२ जूनला फक्त २० हजार ९६५ लोकांनी ३२३ कोटी रुपयांचे दावे केले होते. पंरतु, आतापर्यंत केवळ ४.०८ टक्के लोकांनाच विम्याची रक्कम मिळाली आहे. सरासरी दाव्याची प्रतिव्यक्ती रक्कम १.६० लाख रुपये इतकी आहे.

कोरोना संसर्गाने आतापर्यंत ३७ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असला तरी केवळ ५६१ मृतांच्या नातलगांनी आयुर्विमा महामंडळाकडे २६.७४ कोटींचे दावे केले आहेत. मृत्यु पश्चात दाव्यांबाबत आयुर्विमा महामंडळ संवेदनशील असते. मृतांच्या कुटुबियांच्या आर्थिक मदतीसाठी मंडळ धावून जाते. करोनामुळे मृत्यूबाबतचे दावेही तत्परतेने निकाली काढले जात असून संबंधितांना आर्थिक साहाय्य केले जात आहे, असे आयुर्विमा महामंडळाने स्पष्ट केले.