क्रेडीट कार्डवरून ५० हजार कोटींचे व्यवहार

एकीकडं देशातील कोरोना रुग्णवाढीचं प्रमाण कमी होत असतानाच दुसरीकडं क्रेडीट कार्डवर करण्यात येणारा खर्चही कोरोनापूर्व काळातील स्तरावर गेल्याची आकडेवारी समोर येतेय. मंदावलेल्या अर्थव्यस्थेसाठी ही दिलासादायक घटना मानली जातेय.

कोरोना काळात बाजारपेठांवर मंदीचं सावट असतानाच ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खिसा रिकामा केल्याचं आढळून आलंय. क्रेडीट कार्डवर करण्यात येणारा खर्च आता कोरोनापूर्वीच्या स्तरावर गेला असल्याची आकडेवारी रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलीय.

ग्राहकांनी ऑगस्ट महिन्यात क्रेडीट कार्डच्या माध्यमातून ५०,३११ कोटी रुपये खर्च केलेत. त्यापूर्वी मार्च महिन्यात हा आकडा ५०,५७४ कोटी इतका होता. तर फेब्रुवारीमध्ये क्रेडीट कार्डच्या माध्यमातून ६२,१४८ कोटी खर्च केलेत.

ऑगस्ट २०१९ मध्ये ग्राहकांनी क्रेडीट कार्डच्या माध्यमातून ६०,०११ कोटी रुपये खर्च केलेत. क्रेडीट कार्जवरचं थकीत कर्ज सध्या फेब्रुवारी आणि मार्चच्या नंतर उच्चांकी पातळीवर पोहोचलंय. ऑगस्टमध्ये संपूर्ण बँकिंग व्यवस्थेची एकूण कर्जाची देणी १.०४ लाख कोटींच्या घरात होती.