लॉकडाऊन असला तरी आर्थिक कामांचा पडू देऊ नका विसर,३० एप्रिलपर्यंत उरका ‘ही’ कामे

कोरोना संकटाच्या(corona spread) पार्श्वभूमीवर आपल्यापैकी अनेकजण या महिन्यातच पूर्ण करावयाची काही महत्त्वाची आर्थिक कामे विसरले असण्याची शक्यता आहे. ३० एप्रिल २०२१पूर्वी पूर्ण करायच्या काही महत्त्वाच्या आर्थिक कामांची आज आम्ही तुम्हाला आठवण करुन देणार आहोत.

  नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या(corona spread) पार्श्वभूमीवर आपल्यापैकी अनेकजण या महिन्यातच पूर्ण करावयाची काही महत्त्वाची आर्थिक कामे विसरले असण्याची शक्यता आहे. ३० एप्रिल २०२१पूर्वी पूर्ण करायच्या काही महत्त्वाच्या आर्थिक कामांची आज आम्ही तुम्हाला आठवण करुन देणार आहोत.

  १५एच/१५जी फॉर्म भरा

  लाभांश आणि व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावरील टीडीएस कपात टाळण्यासाठी १५ जी फॉर्म (ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे) आणि १५ एच फॉर्म (ज्येष्ठ नागरिकांसाठी)भरण्याची ही वेळ आहे.

  ज्या नागरिकांचे उत्पन्न प्राप्तिकराच्या २.५ लाख रुपयांच्या मर्यादेखालीच आहे आणि त्यांच्या एकूण उत्पन्नावरील प्राप्तिकर शून्य आहे अशा व्यक्तींनी टीडीएस कपात आपल्या बॅंकेत १५ जी फॉर्म भरणे आवश्यक आहे. १५ एच फॉर्म ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि त्यांचे करपात्र उत्पन्न जर शून्य असेल तर त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. ही वर्षातून एकदा करायची प्रक्रिया आहे. बहुतांश बॅंका आता ऑनलाईन स्वरुपात हे फॉर्म भरू देतात.

  कर नियोजन

  चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजे २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचे कर नियोजन तुम्ही आतापासूनच सुरू केले पाहिजे. आर्थिक वर्षाच्या शेवटी धावपळ करत ऐनवेळी करनियोजन करण्यापेक्षा वर्षाच्या सुरूवातीलाच करणे केव्हाही चांगले.

   पीएफ

  प्राप्तिकराचे पीएफ संदर्भातील नियम १ एप्रिल २०२१पासून लागू आहेत. २.५ लाख रुपयांवरील पीएफ योगदानासाठी कर लागणार नाही. जर तुम्हाला वर्षाकाठी २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक पीएफ कॉन्ट्रिब्युशन ईपीएफ किंवा व्हीपीएफ किंवो दोन्हीद्वारे करायचे असेल तर तुमच्या कंपनीला हे कळवण्याची वेळ आताच आहे. तुमच्या पीएफ कॉन्ट्रिब्युशनसंदर्भात याच महिन्यात निर्णय घ्या.

  तुम्ही जर वर्षाकाठी २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक कॉन्ट्रिब्युशन ईपीएफमध्ये करत असाल आणि तुमचे पीपीएफ खाते नसेल तर याच महिन्यात पीपीएफ खाते सुरू करा. जे गुंतवणुकदार २० टक्के आणि अधिकच्या टॅक्स स्लॅबमध्ये येतात त्यांना पीएफपेक्षा अधिक परतावा पीपीएफमधून मिळू शकतो. कारण सध्या पीपीएफवर ७.१ टक्के करमुक्त व्याज मिळते तर ३० टक्क्यांच्या वरील ब्रॅकेटमधील लोकांना ५.८५ टक्के करपश्चात उत्पन्न मिळते. स्टेट बॅंकेसकट देशातील बहुतांश खासगी बॅंकामध्ये पीपीएफ खाते उघडता येते.

  अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक 

  अल्पबचत योजनांचे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. सरकारी कर्जरोख्यांच्या परताव्यात मागील काही महिन्यांपासून घसरण होते आहे. त्यामुळे सरकारला व्याजदरात कपात करावी लागणार आहे. जरी १ जुलैपासून अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात झाली तरी पोस्ट ऑफिस मंथली स्कीम, किसान विकास पत्र, एनएससी आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासारख्या योजनांमध्ये तुम्ही जर या तिमाहीत गुंतवणूक केली तर फायदा होईल.