खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर आता इशाऱ्याऐवजी स्टार रेटिंग; ग्राहकांना बसणार फटका?

हा प्रकार म्हणजे ग्राहकांच्या आरोग्याशी छेडछाड करणारा धोकादायक खेळ ठरेल असे सांगत देशातील ग्राहक संरक्षण संघटनांनी या नव्या फंड्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. या नव्या प्रकाराने उत्पादक कंपन्यांचाच लाभ होईल. ग्राहकांना मात्र त्याचा फटका बसू शकतो असे या संघटनांचे मत आहे.

    नवी दिल्ली : पाकीटबंद खाद्यपदार्थांच्या वेष्टनांवर पदार्थातील घटकांची माहिती आणि प्रमाण दाखवणारा इशारा छापणे देशात अनिवार्य आहे. पण आता भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) वेगळाच फंडा राबवण्याचे ठरवले आहे. आता अशा खाद्यपदार्थांच्या पाकिटावर त्यातील घटकांच्या प्रमाणांऐवजी आरोग्य स्टार रेटिंग (एचएसआर) छापायला मंजुरी देण्याचे खाद्य मानक प्राधिकरणाने ठरवले आहे.

    मात्र हा प्रकार म्हणजे ग्राहकांच्या आरोग्याशी छेडछाड करणारा धोकादायक खेळ ठरेल असे सांगत देशातील ग्राहक संरक्षण संघटनांनी या नव्या फंड्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. या नव्या प्रकाराने उत्पादक कंपन्यांचाच लाभ होईल. ग्राहकांना मात्र त्याचा फटका बसू शकतो असे या संघटनांचे मत आहे.

    पाकीटबंद खाद्यपदार्थांच्या वेष्टनांवरील इशाऱ्यामुळे त्यातील मीठ, साखर आणि फॅट्स या आरोग्याला अपायकारक ठरू शकणाऱ्या घटकांची माहिती ग्राहकांना मिळते. त्यामुळे असे खाद्यपदार्थ विकत घेताना ग्राहक जागरूक राहतात. मात्र इशाऱ्याऐवजी हेल्थ स्टार रेटिंग (एचएसआर) अशा खाद्यपदार्थांच्या पाकिटावर छापल्यास त्यातील घटकांचे प्रमाण ग्राहकांना समजू शकणार नाही.

    त्यामुळे अपायकारक घटक अधिक असल्यास असे खाद्यपदार्थ ग्राहकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतील असे आहार आणि ग्राहक संरक्षण तज्ञांचे म्हणणे आहे. केवळ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोनच देशांत हा एचएसआर छापण्याचा फंडा सुरू आहे. पण त्याविरोधात आता ग्राहकच तक्रारी करू लागले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानात हा प्रकार सुरू करण्याचे प्रयोजनच काय, असा सवाल आरोग्यतज्ञांनी ‘एफएसएसएआय’ला केला आहे.

    instead of warning star ratings on food packets