लॉकडाऊनमुळे देशातील साखर उद्योग कोलमडला, निर्यातीवर निर्बंध

समीर मुजावर, कोल्हापूर: कोरोना व्हायरसचे जगभरातील थैमान आणि त्यामुळे उचलण्यात आलेले लॉकडाऊनचे पाऊल यामुळे भारतातील साखर उद्योग अक्षरशः कोलमडून पडला आहे. केंद्र शासनाने १ ऑक्टोबर २०१९ ते

 समीर मुजावर, कोल्हापूर: कोरोना व्हायरसचे जगभरातील थैमान आणि त्यामुळे उचलण्यात आलेले लॉकडाऊनचे पाऊल यामुळे भारतातील साखर उद्योग अक्षरशः कोलमडून पडला आहे. केंद्र शासनाने १ ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० अखेर भारतातून ६० लाख टन साखर निर्यात करण्याला परवानगी दिली आहे.यामध्ये एकट्या महाराष्ट्राला १८ लाख टन साखर निर्यातीचा कोटा मिळाला आहे. मात्र कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे आत्तापर्यंत केवळ ३८ लाख टन साखरच भारताबाहेर जावू शकली आहे. आता साखर कारखान्यांकडे पडून असलेल्या साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा मागणी थंडावली असून साखरेचे भाव सुद्धा कमी झाले आहेत.त्यामुळे देशातल्या साखर कारखानदारीचा यापुढे कणाच मोडला जाणार आहे, अशी माहिती तज्ञांनी नवराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना दिली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत न्युयॉर्क आणि लंडन येथील ट्रेडवर साखरेचे दर ठरवण्यात येतात.त्यानुसार ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० अखेर भारताबाहेर निर्यात होणाऱ्या साखरेत देशातील साखर कारखानदारांकडील ३० ते ३२ लाख टन साखर शिल्लक आहे. यामध्ये महाराष्ट्रात उत्पादन करण्यात आलेल्या साखरेपैकी ११ लाख टन साखर निर्यात झाली आहे.मात्र अद्याप ९ लाख टन साखर कारखान्यात शिल्लक आहे.रमजान महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातील साखरेला मोठी मागणी असते. मात्र लॉकडाऊनमुळे बंदरांची उपलब्धता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने देशातील साखर निर्यात करण्यासाठीची ही संधी यावर्षीतरी हुकली असल्याचे साखर उद्योगातील जेष्ठ अभ्यासक विजय अवताडे यांनी बोलून दाखवली.

ब्राझीलमध्ये यंदा उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून तब्बल ३३० लाख टन साखर यातून तयार होणार आहे. ६० ते ७० लाख टन अतिरिक्त साखर आणि तितकेच इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे.ही अतिरिक्त ६० ते ७० लाख टन साखर ब्राझीलकडून निर्यात केली जाण्याची शक्यता असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दरसुद्धा घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.कोरोनामुळे देशात झालेले लॉकडाऊन आणि ब्राझील च्या साखर उत्पादनामुळे भारताला यापुढे साखर निर्यातीवर मर्यादा आल्या असून ६० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष पूर्ण होणार का याबबत साशंकता निर्माण झाली आहे,असे विजय अवताडे यांनी सांगितले. देशात आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नुकताच संपला आहे. तर काही कारखान्यात अद्याप उसाचे गाळप सुरूच आहे.त्यामुळे उत्पादित साखर निर्यात न झाल्याने ती तशीच पडून आहे.आणि पुन्हा चार महिन्यानंतर साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु होणार आहे, त्यामुळे साखरेचा साठा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहणार आहे.पर्यायाने साखरेचे दर घसरण्याची शक्यता असल्याने साखर कारखानदारीचा कणा मोडून पडणार असून उपलब्ध साखरेला पुन्हा बाजारपेठ मिळणार का हा प्रश्न साखर कारखानदारांच्या पुढे उभा ठाकला आहे.