ईडीएफ, आय२ईएन आणि व्हीजेटीआय यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

मुंबई : भारतातील महाराष्ट्र राज्यात सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवहार्यतापूर्व अभ्यासासाठी ईडीएफ, आय२ईएन आणि व्हीजेटीआय या संस्थांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थात्मक, औद्योगिक व शिक्षण/संशोधनात्मक पातळीवरील नागरी अणु क्षेत्रातील भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय सहकार्याचे बळकटीकरण करणे, औद्योगिक क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींचा विस्तार, सुरक्षिततेबाबतच्या अत्युच्च मानकांचे अवलंबन आणि अतिप्रगत प्रशिक्षण दृष्टिकोन यांना चालना देणे हे या तीन संस्थांचे उद्दिष्ट आहे.

जैतापूर प्रकल्पाची संरचना, प्रोक्युरमेंट, बांधकाम, कार्यान्वयन आणि परिचालनाशी निगडित सर्व कामांच्या संदर्भात आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण देणे हे या सेंटर ऑफ एक्सलन्सचे लक्ष्य असणार आहे. शिक्षण/संशोधन क्षेत्रातील, तसेच औद्योगिक क्षेत्रातील भागधारकांचा या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सहभाग असेल, ज्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येणारे विशेष अभ्यासक्रम आणि मोड्यूल्स हे प्रकल्पाशी संबंधित विविध निश्चित गरजा आणि प्रत्यक्ष कामकाजातील आवश्यकतांसंदर्भातील सर्व उत्तरे देण्यास सक्षम असतील, याची खातरजमा केली जाईल. ज्ञानी अध्यापक, संशोधक आणि औद्योगिक तज्ज्ञांच्या माध्यमातून भारतातील या ईपीआर प्रकल्पाच्या विकासात सहभागी असलेल्या भारतीय कंपन्यांमधील अभियंते व तंत्रज्ञ, तसेच पुरवठादारांना हे सेंटर ऑफ एक्सलन्स प्रशिक्षण देईल.

जैतापूर प्रकल्प हा भारत व फ्रान्स यांच्या भागिदारीसाठी धोरणात्मक प्रकल्प असून २ ईपीआर युनिट्सच्या बांधकाम कालावधीत भारतात २५ हजार थेट रोजगारांसह अतिउच्च कौशल्याधारित रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. २०३५ सालापर्यंत प्रतिवर्षी ७५ टेरावॉट प्रति तासापर्यंत कार्बनमुक्त वीज निर्मितीची क्षमता असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून ७ कोटी घरांना पुरेल इतकी वीज पुरवली जाणार असून प्रतिवर्षी ८ कोटी टन कार्बन उत्सर्जनाला आळा बसणार आहे.

व्हीजेटीआयचे संचालक प्रा. धीरेन पटेल म्हणाले : “ईपीआर तंत्रज्ञानाशी निगडित आवश्यक अशी वैशिष्ट्यपूर्ण कौशल्ये आत्मसात करण्यासाठी हे सेंटर ऑफ एक्सलन्स सामायिक व्यासपीठ म्हणून काम करेल. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी व परिचालनासाठी आवश्यक असलेले शाश्वत प्रशिक्षण आणि संशोधन परिसंस्थेच्या उभारणीसाठी, तसेच “आत्मनिर्भर” मोहिमेअंतर्गत भविष्यातील प्रकल्पांसाठी सुरक्षिततेवर विशेष भर देऊन, आपल्या देशातील अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया रचणाऱ्या संस्थांपैकी एक असलेले व्हीजेटीआय क्षमता निर्मितीमधील आपल्या प्रदीर्घ व समृद्ध अनुभवाचा चांगला वापर करू शकेल.”

आय२ईएनचे संचालक डॉ. हेन्री साफा म्हणाले, “यशस्वी अणु प्रकल्पासाठी प्रशिक्षण हा अत्यंत कळीचा घटक आहे. यामुळे उद्योग क्षेत्रात, संबंधित कंपनीत, तसेच भारतीय पुरवठा साखळीत रोजगार निर्मिती होऊन स्थानिक पातळीवर आर्थिक विकासाला गती मिळते. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी आय२ईएन आपले योगदान देईल. व्हीजेटीआय आणि अन्य भारतीय अणु भागधारकांसमवेत यशस्वीरित्या एकत्र काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

ईडीएफ समूहात नव्या अणु प्रकल्प विकास विभागाचे प्रमुख वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. वाकिस रमाणी म्हणाले, “स्किल्स इंडिया राष्ट्रीय कार्यक्रमाला साथ देण्यासाठी ईडीएफ कटिबद्ध आहे. जैतापूर येथील सहा ईपीआरचा प्रकल्प आणि एकूणच भारतीय अणु उद्योग क्षेत्राला पाठबळ देण्याच्या संदर्भात मनुष्यबळ क्षमता विकास आणि कौशल्य विकासात गुंतवणुकीला आमचे प्राधान्य आहे. व्हीजेटीआय आणि आय२ईएन यांसारख्या दोन प्रतिष्ठित संस्थांशी भागिदारी करताना आणि अभियांत्रिकी व शिक्षण/संशोधन क्षेत्रात भारत-फ्रान्स संबंध अधिक सुदृढ करण्यात योगदान देताना आम्हाला अभिमान वाटत आहे. भारतात ईपीआर तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची वृद्धी होण्यासाठी, तसेच नजीकच्या भविष्यात भारतीय तंत्रज्ञ आणि अभियंत्यांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी योगदान देण्यात हे सेंटर ऑफ एक्सलन्स उपयुक्त ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.”