“महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २३ जुलै पर्यंत मुदतवाढ द्यावी” – कृषिमंत्री दादा भुसे

नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा अन्य रोगांमुळे पिकांचं नुकसान झालं तर त्यासाठी शेतकऱ्याला मदत मिळावी म्हणून २०१६ सालापासून पंतप्रधान पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. खरीप हंगाम सुरु होताच दरवर्षी शेतकरी आपल्या पीकांचा विमा काढून घेतात.

    राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे. यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठविल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

    पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याचा आज (१५ जुलै) शेवटची मुदत असून आतापर्यंत सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने २३ जुलै पर्यंत योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव आज राज्य सरकारने केंद्र शासनाकडे पाठविला आहे.

    या संदर्भात राज्य सरकारचा जर आज प्रस्ताव आला तर नक्की पीकविम्याची मुदतवाढ दिली जाईल असं आश्वासन केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान, नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा अन्य रोगांमुळे पिकांचं नुकसान झालं तर त्यासाठी शेतकऱ्याला मदत मिळावी म्हणून २०१६ सालापासून पंतप्रधान पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. खरीप हंगाम सुरु होताच दरवर्षी शेतकरी आपल्या पीकांचा विमा काढून घेतात.