भारतातील दुचाकींची घरच्या घरी सुलभ, संपर्कहीन दुरुस्ती सेवेसाठी शेल ल्युब्रिकंट्सची हुपी सोबत भागीदारी

नवी दिल्ली : फिनिश्ड ल्युब्रिकंट्स क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीची कंपनी असलेल्या शेल ल्युब्रिकंट्सने जगातील सर्वात मोठी दुचाकी बाजारपेठ असलेल्या भारतात संपर्कहीन, सहज उपलब्ध होणारी आणि अत्यंत विश्वासू अशी घरच्या घरी दुचाकी दुरुस्तीसेवा पुरवण्यासाठी हुपी या आगळ्यावेगळ्या, तंत्रज्ञानाधारित उद्योगाशी भागीदारी केली आहे.

कोविड १९ चा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेल्या मेकॅनिक समुदायाला उत्पन्नाचा स्थिर स्त्रोत उपलब्ध करून देतानाच ग्राहकांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवेचा पर्याय निर्माण करण्याच्या गरजेतून अशा प्रकारच्या सेवेची संकल्पना विकसित झाली आहे. कोविडच्या साथीच्या काळात अनेकांनी आपापल्या मूळ गावी जाणे पसंत केल्यामुळे भारतीय मेकॅनिक समुदायाच्या व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे.

“गेल्या दोन महिन्यांमध्ये दुचाकीच्या मेकॅनिक्ससमवेत व्हर्च्युअल माध्यमातून आमचा जो हजारोवेळा संवाद झाला, त्यातून त्यांच्याकडे येणारे ग्राहक आणि त्यांचे उत्पन्न यात सातत्य राहिलेले नसल्याचे आमच्या लक्षात आले. यासंदर्भात आम्ही काहीतरी करावे, अशी आग्रहाची विनंती अनेकांनी केली आणि त्यातूनच या कल्पनेचा जन्म झाला. केवळ त्यांना रोजगाराच्या अधिक चांगल्या संधीच नव्हे, तर अधिक मोठ्या प्रमाणावर स्वावलंबी बनवणारी ही संकल्पना आहे,” असे शेल ल्युब्रिकंट्स इंडियाचे कंट्री हेड रमण ओझा म्हणाले.

मेकॅनिक समुदाय हळूहळू आपल्या कामाच्या ठिकाणी परतत असताना त्यांना सुरक्षितपणे आपला व्यवसाय करता यावा, यासाठी मदत करण्यासाठी शेल आणि हुपी भागीदार म्हणून उत्सुक आहेत. येत्या काही दिवसांमध्ये या भागिदारीच्या माध्यमातून किमान पाच हजार मेकॅनिक्सना प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी व्यवसायनिर्मिती करण्यावर भर दिला जाणार असून या साथीमुळे त्यांच्या रोजगारावर जो विपरित परिणाम झाला आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना पाठबळ देणे, हे उद्दिष्ट आहे. यामुळे वाहन उद्योगातील तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा लाभ घेऊन सबळ, स्वावलंबी मेकॅनिक्सचा समुदाय निर्माण होण्यास मदत होईल. ही भागीदारी आणि या कार्यक्रमामुळे मेकॅनिक्सना निश्चित व्यवसाय उपलब्ध होण्याबरोबरच त्यांच्या गॅरेजमधील उत्पन्नापेक्षा ३० ते ४० टक्के अधिक उत्पन्न मिळण्याचीही शक्यता आहे.

सध्याच्या ‘न्यू नॉर्मल’ परिस्थितीत अधिकाधिक ग्राहक किफायतशीरपणाबरोबरच संपर्कहीन सेवेची मागणी करत आहेत. आमच्या या सहयोगामुळे ग्राहकांना तंत्रज्ञानाधारित व्यासपीठाच्या माध्यमातून किफायतशीर सेवा उपलब्ध होणार असून ते सेवेची नोंदणी, नोंदणीपासून प्रत्यक्ष सेवा उपलब्ध होईपर्यंतच्या टप्प्यांचा मागोवा, ॲप आणि वेबसाइटच्या माध्यमातून पैसे अदा करणे आदी गोष्टी घरबसल्या अत्यंत सुलभरित्या करू शकतात. सगळ्याच महत्त्वाचे म्हणजे विश्वासार्ह आणि प्रशिक्षित व्यावसायिकाकडून आपल्या वाहनाची कुठेही, कधीही देखभाल व दुरुस्ती करून घेऊ शकतात.

“आपला संपूर्ण समाजच अत्यंत कठिण परिस्थितीतून सध्या जात आहे. मेकॅनिक समुदाय हा या देशातील वाहन परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे एक कंपनी म्हणून मेकॅनिक समुदायासाठी उत्तम संधी आणि कामाचे वातावरण निर्माण करून त्यांच्या आयुष्यात योगदान देण्याबरोबरच ग्राहकांना घरबसल्या वाहनाच्या सुरक्षित देखभाल व दुरुस्ती सेवेचा विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे,” असे ओझा म्हणाले.

हुपीचे सहसंस्थापक आणि सीओओ शशांक दुबे म्हणाले, “शेल आमचा विशेष विस्तार आणि ल्युब्रिकंट भागिदार झाल्यामुळे आम्ही रोमांचित झालो आहोत. विश्वास आणि गुणवत्ता यासाठी शेल ओळखले जाते आणि या सहकार्याच्या माध्यमातून आम्हाला सध्याच्या कठीण काळात लोकांना घरच्या घरी सुलभ, योग्य काळजी घेऊन आणि गुणवत्तापूर्वक सेवा पुरवणे शक्य होईल. कोव्हिड १९च्या काळात ग्राहक सुरक्षित आणि उच्च गुणवत्तेच्या दुचाकी देखभाल व दुरुस्ती सेवेचा लाभ कशाप्रकारे घेऊ शकतात, याचे मापदंड या भागिदारीमुळे निर्माण होतील.”

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.