जूनमध्ये भारतात दाखल झाले २,२२५ कोटी रुपयांचे स्मार्टफोन

भारतातील स्मार्टफोन मार्केट कोरोना विषाणूच्या टाळेबंदीमुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. यामुळेच जून महिन्यात कंपन्यांनी उच्चांकी आयात केली. गेल्या तीन वर्षात सर्वाधिक आयात यावर्षी जून महिन्यात केली आहे. यात २,२२५ कोटी रुपये किंमतीचे स्मार्टफोन भारतात आयात करण्यात आले आहेत. उत्पादन बंद असल्याचाही यावर मोठा परिणाम झाला आहे.

मुंबई : स्मार्टफोन मार्केटने वर्ष २०२० मध्ये अनेक चढ-उतार पाहिले तसेच कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या टाळेबंदीचाही प्रभाव मार्केटवर पडला आहे. जून महिन्यात ३ वर्षात सर्वाधिक आयात भारताने केली आहे. भारताचे जवळजवळ संपूर्ण स्मार्टफोन मार्केट विदेशी कंपन्यांवर अवलंबून आहे.अशातच सर्वाधिक डिवाइस विदेशातून येतात. स्थानिक उत्पादनांवर आलेल्या निर्बंधांनंतर पुन्हा विक्री सुरू झाली आणि कंपन्या पुन्हा एकदा वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाल्या.

वाणिज्य मंत्रालयाने शेअर केलेल्या डेटानुसार, फेब्रुवारी महिन्यात ५.६ कोटी रुपये किंमतीचे डिवाइसेस आयात करण्यात आले तर जून महिन्यात भारतात आयात केलेल्या फोन्सची किंमत जवळपास २,२२५.२ कोटी रुपये आहे. मे महिन्यात  करण्यात आलेल्या आयातीच्या तुलनेत हे प्रमाण सहापट आहे. जुलै महिन्यात ही आयात १० पट वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती मार्केट तज्ञांनी दिली. आयात करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये शाओमी, विवो, ओप्पो आणि रियलमी सर्वात अग्रस्थानी आहेत.

टाळेबंदीमुळे अडचणी वाढल्या

स्मार्टफोन ब्रँड्सला या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या कारणामुळेच जूनमध्ये आयातीत वाढ झाली असे मत काउंटरपॉईंट रिसर्चचे सहयोगी संचालक तरुण पाठक यांनी व्यक्त केले. कोरोना विषाणूपूर्वी भारतात विकले गेलेले जवळपास ९५ टक्के फोन भारतात स्थानिक प्रकल्पात सुटे भाग एकत्र करून तयार करण्यात आले होते. यादरम्यान बाहेरून आयात केलेल्या वस्तूंचे मूल्य जवळपास ५.६ कोटी रुपये होते.

आयात करावे लागले फोन

सर्वाधिक विक्री होणारे स्मार्टफोन ब्रँड्स विवो, ओप्पो, रियलमी, वनप्लस आणि सॅमसंगचे भारतात स्वत:चे उत्पादन प्रकल्प आहेत. नोएडा, उत्तर भारत आणि दक्षिणेत तयार झालेल्या या प्रकल्पात डिवाइसेसचे उत्पादन टाळेबंदीच्या काळात न झाल्याने कंपन्यांना तयार असलेले फोन आयात करावे लागले. साधारणपणे या प्रकल्पात विदेशातून सुटे भाग मागविले जातात आणि फोन भारतात तयार केले जातात.