देशातील १ कोटीहून अधिक ग्रामीण नवउद्योजकांच्या डिजीटल व आर्थिक सबलीकरणासाठी सोनू सूद यांची ‘स्पाईस मनी’शी भागीदारी

मुंबई : स्पाईस मनी या भारतातील आघाडीच्या ग्रामीण फिनटेक कंपनीने मानवतावादी, परोपकरी अभिनेते सोनू सूद यांच्याशी हातमिळवणी करून, ग्रामीण भागातील १ कोटी नवउद्योजकांना डिजिटल व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे सामायिक धोरण अवलंबित असल्याचे घोषित केले आहे.

‘कोविड-१९’ची साथ सुरू झाल्यापासूनच सोनी सूद यांनी देशाच्या काना-कोपऱ्यातील गरजू व्यक्तींना मदत करण्याचे ध्येय बाळगले आहे; तर डिजिटल सक्षमीकरण व आर्थिक समावेशन यांच्या माध्यमातून देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे हे ‘स्पाईस मनी’चे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भारताची डिजिटल स्वरुपात उन्नती व्हावी या समान उद्देशाने, सोनू सूद व स्पाईस मनी यांनी गावांमध्ये व लहान शहरांमध्ये नवउद्योजकतेची मानसिकता घडविण्याचे काम एकत्रितपणे करण्याचे ठरविले आहे. या युतीमध्ये, सोनू सूद हे ‘स्पाईस मनी’मध्ये इक्विटी गुंतवणूक करून भागीदार होणार आहेत व या कंपनीच्या ‘अकार्यकारी सल्लागार मंडळाच्या सदस्य’पदी त्यांची नियुक्ती होणार आहे.

ग्रामीण आणि शहरी भारतातील दुरावा कमी करणारे नवीन उपक्रम आणि उत्पादने तयार करण्यासाठी स्पाईस मनी सोनू सूद यांच्यासह एकत्रितपणे उपक्रम आखणार आहे. टाऴेबंदीदरम्यान सोनू सूद यांनी विकसित केलेले काही निवडक उपक्रम स्पाइस मनी आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करुन देणार आहे.

कंपनीच्या ‘अकार्यकारी सल्लागार मंडळाचे सदस्य’ या नात्याने, सोनू हे उद्योजकांचे जाळे निर्माण करण्यास हातभार लावतील आणि ग्रामीण भारतात आर्थिक समावेश आणि डिजिटल सबलीकरणाला प्रोत्साहन देतील. स्पाइस मनी अधिकारी (उद्योजक) यांच्याबरोबर काम करून डिजीटल उत्पादने सादर करण्याच्या कामात सोनू सहभागी होतील. त्यातून ‘स्पाइस मनी’ अधिकाऱ्यांच्या डिजिटल प्रवासाला तंत्रज्ञानाच्या आधारे सुरुवात होईल. सोनू सूद हे ‘स्पाइस मनी’च्या पहिल्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरच्या रूपातदेखील दिसतील.

‘स्पाइस मनी’चे संस्थापक दिलीप मोदी म्हणाले, “एक कोटीहून अधिक ग्रामीण उद्योजकांना डिजिटल आणि आर्थिक सक्षम बनवण्याची स्पाईस मनीची मोहीम आहे. अशीच आवड असलेल्या सोनू सूद यांच्याशी भागीदारी करीत असल्याचा आम्हाला आनंद आहे. आपले घर व कुटुंबीय यांना न सोडता उपजीविका करण्यास भारतीयांना सक्षम बनविण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा उपयोग एकत्रितपणे करू. ‘स्पाईस मनी प्लॅटफॉर्म’च्या माध्यमातून डिजिटल सोल्युशन व ज्ञान निर्मिती उपलब्ध करून देण्याचे काम या आमच्या भागीदारीतून आम्ही करणार आहोत व यातून भारताच्या प्रत्येक भागात आत्मनिर्भरता, नवउद्योजकता व आर्थिक समावेशकता यांचा प्रसार करणार आहोत.’’

यावेळी बोलताना सोनू सूद म्हणाले, “माझा ठाम विश्वास आहे की एकत्रितपणे आम्ही आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करू. “हमे हर गाव को डिजिटली सक्षम बनाना है”. गेल्या काही महिन्यांतील माझ्या अनुभवांच्या आधारे, मला भारतातील शहरे आणि गावांमधील लोकांच्या गरजा व त्यांची धडपड यांच्याकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन लाभला. तंत्रज्ञानाचा वापर करून माझ्या देशवासीयांना सामाजिक-आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी बनविण्याची माझी इच्छा आहे. ‘स्पाइस मनी’च्या सहकार्याने आम्हाला हे उद्दिष्ट गाठण्यात मदत होईल. या कंपनीचे तंत्रज्ञानातील प्रावीण्य आणि देशभरात असलेली व्याप्ती, यामुळे मला ग्रामीण भारतातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक अतुलनीय व्यासपीठ मिळाले आहे.”

‘स्पाईस मनी’च्या कामकाजास २०१५ पासून सुरुवात झाली. तिच्या डिजिटल अधिकाऱ्यांपैकी (नवउद्योजक) ९० टक्के जण निमशहरी व ग्रामीण भागातील आहेत. त्यांच्या आर्थिक समावेशनासाठी कंपनी सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे. सेवा मिळत असलेले व सेवेपासून वंचित राहणारे यांच्यातील तफावत दूर करण्यात ही कंपनी कार्यरत आहे. आपल्या या ग्राहकांना डिजिटल व आर्थिक सेवा दाराशी नेऊन देण्याची सेवा ती पुरविते. भारतातील ७०० हून अधिक जिल्हे, ५ हजारांहून अधिक ब्लॉक्स व १८ हजारांहून अधिक पिनकोड येथे ही सेवा देऊन कंपनी वेगाने प्रगती करीत आहे.