चीनशी नातं तोडणार TikTok, विकणार व्हिडिओ शेअरिंग ॲप

शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉक भारताने बॅन केल्यानंतर अन्य देशही भारताचाच कित्ता गिरवण्याच्या विचारात आहेत. ॲपसाठी एवढा मोठा युजरबेस गमावणे एखाद्या संकटाहून कमी नाही. हे ॲपवर अमेरिकेतही बॅन लागण्याची शक्यता आहे. यापासून आपला बचाव करायचा असेल तर टिकटॉकला आपली चायनीज ओळख विसरावी लागणार आहे. हे ॲप विकलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग ॲप TikTok वर्ष २०२० हे फारसं मानवलं नाही. चायनीज ॲप अशी ओळख असल्याने एकापाठोपाठ एक देश TikTok बॅन करत असून कंपनीसाठी हे एखाद्या संकटाहून कमी नाही. चीननंतर दुसरं सर्वात मोठं मार्केट असलेल्या भारतात हे ॲप जूनच्या अखेरीस बॅन करण्यात आलं. आता अमेरिका आणि जपान सारखे देशही हेच पाऊल उचलणार आहेत. मोठा युजरबेस गमावल्यानंतर ॲपची स्थिती अतिशय ढासळू लागली आहे.

युजर्सचा डेटा त्याच्या परवानगीशिवाय परदेशात पाठविणे आणि बाहेरच्या सर्व्हरवर स्टोर करण्याचे आरोपही टिकटॉक ॲपवर करण्यात आले आहेत. डेटाशी संबंधित तक्रारींनंतर दक्षिण कोरियासह काही देशांनी ॲपवर कोट्यावधी रुपयांचा दावा ठोठावला आहे. यासोबतच ॲपची चायनीज ॲप अशी असलेली ओळखही यासाठी नुकसानकारक ठरत आहे. अशातच चीनशी असलेले सर्व संबंध तोडणे हाच युजर्सशी जोडून राहण्याचा एकमेव पर्याय उरला आहे.

अमेरिकेत बॅन होण्याची आहे भीती

आमचा स्टाफ अमेरिकेचा आहे आणि चीन सरकारसोबत युजर्सचा डेटा कधीही शेअर करण्यात येणार नाही असं कंपनीने वारंवार सांगितलं आहे. टिकटॉकची मूळ कंपनी ByteDance चायनीज आहे आणि भारतानंतर अमेरिकेचा युजरबेस गमावणं हे कंपनीला परवडणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वत: हे ॲप बॅन करणार असल्याचं सांगितलं आहे आणि यापासून वाचण्यासाठी टिकटॉक ॲप आता स्वत:ला विकण्याच्या प्रयत्नात आहे.

टिकटॉक विकलं जाण्याची शक्यता

The New York Times च्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेत बॅन होण्यापासून बचावासाठी आणि स्वत:ला वाचविण्यासाठी टिकटॉकला विकावं लागेल. मायक्रोसॉफ्टने हे ॲप विकत घ्यावं अशी व्हिडिओ शेअरिंग सर्व्हिसची इच्छा असून त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. टिकटॉकला नव्याने लक्ष्य करण्यात येत आहे पण आम्ही कोणाचे शत्रू नाही असं वक्तव्य टिकटॉकचे सीईओ केविन मेयर यांनी नुकतंच केलं आहे. ॲपने सपशेल माघार घेतली असून स्वत:ला वाचविण्यासाठी विकणं हेच उत्तम असल्याचं सकृतदर्शनी तरी वाटत आहे.