बँक बॅलन्स भरपूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स

गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार केला, तर विशेषत: गृहिणी पैसा गुंतवणुकीसाठी काही पर्याय अवलंबतात. ही गुंतवणूक आपल्या घरासाठी असते, खास तर भविष्यासाठी.. मुलांच्या शिक्षणासाठी, अकस्मात उद्भवणारे खर्च असोत किंवा ती गुंतवणूक स्वत:साठी केलेली असो. कधी महिला आपल्याकडील खर्चातील उर्वरित रक्कम ही सेव्हिंग करताना दिसतात. आपल्या कुटुंबासाठी केलेली ही बचत त्यांना अपूर्व आनंद देणारी असते. यासाठी मग महिला आपल्याकडूनही कुटुंबासाठी हातभार लागावा म्हणून मग भिशी, फंडाच्या माध्यमातून पैसा गुंतवणूक करतात. बचत गटांच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक असो किंवा एखाद्या संस्थेमार्फत केली जाणारी गुंतवणूक असो, ही गुंतवणूक करताना महिलांनी आपल्या आजूबाजूची परिस्थिती ही विश्वासदर्शक असेल, तर केलेली गुंतवणूक ही फायदेशीर ठरते. अन्यथा फसगतीचे प्रसंग आले, तर आपली गुंतवणूक ही आपले नुकसान करणारी ठरू शकते.

गुंतवणुकीचे महत्त्व
अनेक छोट्या-छोट्या संस्था पैसा गुंतवणुकीच्या माध्यमातून गृहिणींना पैसा गुंतवणुकीचे महत्त्व पटवून त्यांना बचत करण्यास भाग पाडतात. अनेक संस्था साखळी पद्धतीने पैसा गुंतवतात, त्यात पुढे अनेक महिलांना या बचतीचे महत्त्व पटवून साखळी केली की त्याचा कसा फायदा होतो यासाठी महिलांना प्रोत्साहित करतात, अनेकदा पैसे गुंतवणुकीसाठी मनसुबे रचून महिलांना अनेक उदाहरणे देऊन श्रीमंतीची आस दाखवून पैसे? भरण्यास भाग पाडतात. यावेळी आपल्याकडील शिल्लक रक्कम असेल, तर ती घरातील माणसांच्या नकळत भरलीही जाते. याचा पतीला, मुलालाही मागमूस नसतो आणि आपली फसगत झाली की, आपली मूळ रक्कमही गेली याचे दु:ख तर होतेच, शिवाय फसगत करणाऱ्या माणसांनी पोबारा केला की आपले दु:ख आपणच कवटाळून बसण्याशिवाय पर्याय उरत नाही. यावेळी आपल्या खात्यावर असेल, नसेल तेवढी रक्कम गुंतवणे, सोन्याच्या वस्तू असतील, तर त्या विकून त्याची रक्कम गुंतवणे आदी पर्याय निवडताना दिसतात. मात्र, फसगत झाली की, मग पश्चातापाशिवाय हाती काही उरत नाही.

भिशी-बचतगटाची विश्वासार्हता
भिशी करतानाही खात्रीपूर्वक पैसे गुंतवावे. पैसा गुंतवणुकीसाठी अनेकजण आपले मेंबर्स होण्याकरिता गळ घालतात, मात्र आपल्या कष्टाचे पैसे गुंतवावे कुठे आणि कसे गुंतवावे, याचा विचार करणे गरजेचे आहे. शिवाय आपण एखाद्या संस्थेत, नवख्या माणसांकडे पैसे गुंतवले, तर आपल्या घरातील माणसांना याची कल्पना देणे गरजेचे आहे. दागिने गहाण ठेवताना, त्यांची विक्री करतानाही, पैशांचा व्यवहार करताना विश्वासू माणसांकडेच करणे हितावह. फंडाच्या माध्यमातून अनेक महिला पैसे गुंतवतात. यावेळी वर्षभरानंतर आपल्या हाती येणारा पैसा, व्याज तपासून पाहणे आवश्यक. याशिवाय ज्यांना फंडाचा पैसा कर्ज म्हणून देत आहोत ती व्यक्ती विश्वासू, ओळखीची आहे का, ती ते कर्ज वेळेत फेडू शकते का, याचीही खात्री करून घेणे आवश्यक आहे.

प्रलोभनाला भुलू नका
जिथे आपले पैसे खऱ्या अर्थाने सुरक्षित राहू शकतात, जिथे विश्वासार्हता जपली जाते तेथेच पैसे गुंतवणे हिताचे ठरू शकते. महिला आपले पैसे बचत करण्यासाठी धडपडतात, मात्र पैसे गुंतवणूक करताना होणारे वादविवाद, कधी होणारी फसगत यातून मग त्या बाहेरही पडतात, मात्र नवीन पर्याय शोधला जातो. वर्षाकाठी आपल्या हाती येणारा पैसा हा बचतीच्या रूपाने समाधान देणारा ठरतो. आकस्मिक खर्चाला पर्याय ठरतो. कधी तर भिशी, फंडातून मिळणारा पैसा हा कुणाच्या सांगण्यावरून पुन्हा कुठेतरी गुंतवणे, कुठल्याही प्रलोभनाला भुलणे हा त्यावरील पर्याय ठरू शकत नाही. पैसा गुंतवताना मार्गदर्शन घेणे, जेथे पैसे गुंतवायचे आहेत त्या व्यक्तीची, संस्थेची संपूर्ण माहिती तसेच खात्री करून घेणे आवश्यक आहे.