मेडिक्लेम पॉलिसीत असे झालेत बदल, प्रिमियमही वाढणार?; जाणून घ्या

  • प्रिमियमही वाढणार

विमा नियामक व विकास प्राधिकरण म्हणजेच ‘आयआरडी़ए‘ने ‘मेडिक्लेम’ पॉलिसीमध्ये जून २०२० मध्ये काही महत्त्वाचे बदल सुचविले आहेत. त्याची अंमलबजावणी एक ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. हे बदल निश्चितच ग्राहकाभिमुख आहेत व हे बदल प्रत्येकाला माहीत असणे आवश्यकही आहे. कारण मेडिक्लेम पॉलिसी ही आता एक आवश्यक बाब झाली आहे अशी माहिती सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर- सीएफपी यांनी सकाळला दिली आहे.

१) आता मेडिक्लेम पॉलिसीमध्ये समाविष्ट असणाऱ्या आजारांची व्याप्ती वाढविली गेली असून, या आधी समाविष्ट नसलेले आजार उदा. हॅझार्डस ॲक्टिव्हिटीमुळे होणारे आजार/अपघात, मानसिक आजार, वयोमानानुसार होणारे आजार, जन्मजात असणारे आजार, कृत्रिम देखभाल, आनुवंशिक आजार, तारुण्य व रजोनिवृत्ती संबंधित आजार, मोतीबिंदू, गुडघ्याचे प्रत्यारोपण, कामाच्या ठिकाणी असणाऱ्या परिस्थितीमुळे उदभवणारे त्वचा रोग अथवा अस्थमा या आजारांचा आता समावेश असणार आहे. याशिवाय ज्या आजारांचा समावेश करायचा नसेल, त्या आजारांचा स्पष्टपणे पॉलिसीत उल्लेख करणे आवश्यक आहे. उदा. एपिलप्सी (अपस्मार), एचआयव्ही/एड्स. तसेच पॉलिसीत ‘वेटिंग पिरियड”चा उल्लेख असणे आवश्यक आहे, हा कालावधी ३० दिवस ते एक वर्षाइतका असू शकतो. या कालावधीत आजार उदभवल्यास क्लेम मिळत नाही. तसेच आता इम्युनोथेरपी, ओरल केमोथेरपी व रोबोटिक सर्जरी यांसारख्या आधुनिक उपचार पद्धतींचा पॉलिसी कव्हरमध्ये समावेश होणार आहे.

२) ज्या पॉलिसीधारकाने सलग आठ वर्षे प्रीमियम नियमित भरला आहे, अशा पॉलिसीधारकाचा क्लेम नवव्या वर्षापासून नाकारता येणार नाही (अपवाद – फसवा किंवा पॉलिसीत समाविष्ट नसलेल्या आजाराचा क्लेम नाकारला जाईल.). हा सुरुवातीच्या आठ वर्षांच्या कालावधी ‘मोरॅटोरियम पिरीयड’ असेल.

३) नव्या नियमानुसार, पॉलिसी घेतलेल्या तारखेपासूनच्या आधीच्या ४८ महिन्यांत निदान झालेल्या आजारास ‘प्री एक्झिस्टिंग डिसीज’ समजण्यात येईल. मात्र पूर्वीप्रमाणे पॉलिसी घेतल्यानंतर तीन महिन्यांच्या आत एखाद्या रोगाचे निदान झाल्यास त्यास ‘प्री एक्झिस्टिंग डिसिज’ समजण्यात येणार नाही. तथापि, याबाबत बरीच संदिग्धता आहे व याविषयी अजून स्पष्टीकरण होणे गरजेचे आहे.

४) सोशल डिस्टन्सिंगच्या उद्देशाने आता टेलिमेडिसिनचा समावेश पॉलिसीत करण्यात येणार आहे.

५) आता क्लेम सेटल करताना प्रमाणित कपात (प्रपोर्शनेट डिडक्शन) करता येणार नाही व त्यासाठी संबंधित वैद्यकीय खर्चाचा (असोसिएट मेडिकल एक्स्पेन्सेस) पॉलिसीत उल्लेख करावा लागणार आहे. यात औषधे, वैद्यकीय उपकरणे व तत्सम बाबींचा समावेश असणार नाही. यामुळे हॉस्पिटलचे रूम चार्जेस जरी पॉलिसीतील रूम चार्जेसपेक्षा जास्त असले, तरी क्लेम डिडक्शन केवळ रूम चार्जेसमध्येच होईल; अन्य खर्चासाठी होणार नाही.

६) आता विमा कंपनी पॉलिसीधारकास योग सेंटर, जिम (व्यायामशाळा), स्पोर्ट्‌स क्लब, हेल्थ सप्लिमेंट यासाठी कूपन देऊ शकतील.

७) काही विमा कंपन्या आता प्रीमियम गिफ्ट कार्ड देऊ लागल्या आहेत, असे गिफ्ट कार्ड मिळणारी व्यक्ती त्या कंपनीच्या मेडिक्लेम पॉलिसीचा प्रीमियम भरू शकतील.

८) थोडक्यात असे म्हणता येईल, की आता मेडिक्लेम पॉलिसी आधीपेक्षा जास्त समावेशक व फायदेशीर झाल्या आहेत. मात्र या बरोबरच प्रिमियममध्ये वाढ होणार आहे.