Zomato देणार गुंतवणूकदारांना पैसे कमविण्याची संधी, पुढील वर्षात IPO ची शक्यता

पुढल्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत Zomoto आयपीओसाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : भारतीय फूड डिलिव्हरी स्टार्टअप Zomoto (झोमॅटो) पुढच्या वर्षी आयपीओ सुरू करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकन गुंतवणूक कंपनी टायगर ग्लोबल मॅनेजमेंट आणि सिंगापूर येथील कंपनी टेमासेककडून १६ कोटी डॉलर्स (सुमारे १२०० कोटी रुपये) गुंतवणूक मिळाली आहे.

Zomoto मध्ये Infoedge ची २३ टक्के भागीदारी आहे. पुढच्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत Zomoto आयपीओसाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला देण्यात आलेल्या माहितीत Info Edge (India) याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. Zomoto ने टायगर ग्लोबल मॅनेजमेंट एलएलसीकडून १० कोटी डॉलर्स आणि टेमासेक होल्डिंग्ज लिमिटेडची उपकंपनी MacRitchie इन्व्हेस्टमेंटकडून सहा कोटी डॉलर्स जमा केले आहेत.

Zomoto चे संस्थापक काय म्हणाले?

Zomoto चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी कर्मचार्‍यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, कंपनी पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आयपीओ मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. “आम्ही बरेच भांडवल उभे केले आहे आणि बँकेत आमची रोकड सुमारे २५ कोटी डॉलर्स आहे. ही आमच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी रोकड आहे. टायगर ग्लोबल, टेमासेक, बॅली गिफोर्ड आणि अँट फायनान्शियलने सध्याच्या फंडिंगमध्ये भाग घेतला आहे. या राऊंडमध्ये अजूनही बरीच मोठी नावे जोडली जात आहेत. आमचा अंदाज आहे की, लवकरच आमची बँकेतील रोकड ६० कोटी डॉलर्स पर्यंत जाईल,” असे दीपिंदर गोयल यांनी म्हटले आहे.

मूल्यांकन किती आहे?

गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणूकीतून कंपनीचे मूल्यांकन सुमारे २५ हजार कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन आणि कोरोना संकटामुळे Zomoto आणि स्विगीसारख्या फूड डिलिव्हरी कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. या कंपन्यांचा व्यवसायही चांगला चालला नाही. अशा परिस्थितीत कंपनीला मोठे भांडवल मिळणे महत्वाचे आहे. Zomotoचे मुख्यालय गुडगाव येथे आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न दुप्पट होऊन सुमारे २९०० कोटी रुपये झाले होते.

जाणून घ्‍या काय आहे आयपीओ?

इनिशियल पब्लिक ऑफर म्‍हणजे आयपीओ. यासाठी कंपन्‍या शेअर बाजारमध्‍ये स्‍वत:ला लिस्‍टेड करून शेअरमध्‍ये गुंतवणूकदारांना विकण्‍यासाठी प्रस्‍ताव आणतात. शेअर बाजारात लिस्‍टेड झाल्‍यामुळे कंपनीच्‍या बाबतीत विस्‍तृत माहिती सार्वजनिक होते. सूचीबद्ध झाल्‍यानंतरच कंपनीचे अधिग्रहण किंवा दुस-या कंपनीत वर्ग होता येते.

आयपीओ का आणतात कंपन्‍या?

कंपन्‍या विस्‍तार करण्‍यासाठी इक्विटी वाढवण्‍यासाठी आणि आपल्‍या इतर गरजा पूर्ण करण्‍यासाठी आयपीओ बाजारात आणतात. कर्ज न घेणे आणि पैशांची गरज भासल्‍यास कंपन्‍या आयपीओची मदत घेतात.