बँक ऑफ बडोदातर्फे ग्रीन राइड- एक पहल स्वच्छ हवा की ओरला फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण यांच्यासह प्रारंभ

स्वच्छ हवेचे महत्त्व समजावून देण्यासाठी आणि लोकांनी वाहतुकीचे शाश्वत पर्याय स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ग्रीन राइडचे आयोजन करण्यात येत आहे. ३ डिसेंबर रोजी मुंबईतून ग्रीन राइडची सुरुवात झाली आणि १३ डिसेंबर २०२१ रोजी दिल्लीमध्ये त्याचा समारोप होईल.

  मुंबई : बँक ऑफ बडोदाने ‘ग्रीन राइड – एक पहल स्वच्छ हवा की ओर’ उपक्रमाचे सुपर-मॉडेल आणि फिटनेस प्रेमी मिलिंद सोमण यांच्यासह लाँच करत असल्याचे जाहीर केले. या उपक्रमाला गेल इंडियाचा पाठिंबा लाभला आहे. या उपक्रमाअंतर्गत मिलिंद सोमण १० दिवस सायकल आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनाने गुजरात, राजस्थान आणि हरियाणामार्गे दिल्लीपर्यंत प्रवास करणार आहेत.

  स्वच्छ हवेचे महत्त्व समजावून देण्यासाठी आणि लोकांनी वाहतुकीचे शाश्वत पर्याय स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ग्रीन राइडचे आयोजन करण्यात येत आहे. ३ डिसेंबर रोजी मुंबईतून ग्रीन राइडची सुरुवात झाली आणि १३ डिसेंबर २०२१ रोजी दिल्लीमध्ये त्याचा समारोप होईल. या प्रवासादरम्यान ते गोधरा, बडोदा, उदयपूर आणि जयपूर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखांना भेट देतील.

  या प्रवासादरम्यान मिलिंद सोमण बँकेच्या कर्मचाऱ्यांशी तसेच चाहत्यांशी संवाद साधतील आणि त्यांना प्रवासाचे आरक्षण करण्यासाठी किंवा कुठेही असताना खरेदी करण्यासाठी बीओबी वर्ल्ड ॲप वापरण्याचा अनुभव सांगतील. त्याचप्रमाणे ते शाश्वत जीवनशैलीचे उदा. उर्जा कार्यक्षम वाहतूक वापरून त्यायोगे सर्वांना स्वच्छ हवा मिळवून देण्याचे महत्त्व अधोरेखित करतील.

  या सहकार्याविषयी बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चढ्ढा म्हणाले, ‘शाश्वतता हा बळकट राष्ट्रासाठी महत्त्वाचा घटक असून बँक ऑफ बडोदा शाश्वत जीवन तसेच पर्यावरण जपणुकीच्या विचारसरणीला ठाम पाठिंबा देते. भारतातील सर्वात लोकप्रिय फिटनेसप्रेमी मिलिंद सोमण यांच्या ‘ग्रीन राइड – एक पहल स्वच्छ हवा की ओर’ या उपक्रमाशी केलेले सहकार्य जागरूकता वाढवण्याचा आणि तरुण भारतीयांना कृती करण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्याचे विस्तारित सामाजिक प्रभावामध्ये रुपांतर करण्याचा प्रयत्न आहे.’

   

  मिलिंद सोमण म्हणाले, ‘ग्रीन राइड हा वाहतुकीच्या हरित पर्यायांचा प्रसार करण्यासाठीचा प्रयत्न आहे. हा एकप्रकारे, आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणी जी हवा श्वासातून आत घेतो, तिला केलेला सलाम आहे. आपल्याच कृतीमुळे हवा प्रदुषित होत असून त्याच्या दुष्परिणामांविषयी सर्वांना अधिक जागरूक करण्याचा हा माझा प्रयत्न आहे. मला आशा आहे, की या उपक्रमामुळे लोक प्रत्येक छोट्या अंतराच्या प्रवासासाठी कारच्या किल्ल्या उचलताना किंवा वीज गेल्यानंतर जेनसेट सुरू करताना किंवा आनंद साजरा करण्यासाठी फटाके उडवताना विचार करतील. आपल्या सर्वांनाच प्रगती आणि विकास हवा आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला जे सुंदर जग माहीत आहे, त्याची किंमत पुढच्या पिढ्यांना चुकवावी लागू नये. तंत्रज्ञानाचे आविष्कार साजरे करूया. प्रगती आणि विकासाचा आनंद साजरा करूया, मात्र त्याआधी ज्या स्वच्छ, अनोख्या हवेत आपण श्वास घेतो, ती साजरी करूया आणि तिच्या जतनासाठी सर्व ते प्रयत्न करूया.’

   

  ए कवीराज, कार्यकारी संचालक (विपणन – शिपिंग आणि आंतरराष्ट्रीय एलएनजी, गेल) म्हणाले, ‘एक जबाबदार कॉर्पोरेट या नात्याने गेल (इंडिया) अधिक स्वच्छ आणि हरित भविष्यासाठी भारताच्या उर्जा क्षेत्रात नैसर्गिक वायू, अक्षय उर्जा, हरित नायट्रोजन आणि इतर स्वच्छ उर्जांसारख्या स्वच्छ इंधनाच्या रुपाने बदल घडवून आणत आहे.’

  वीबा आणि अर्थमेड ऑर्गेनिक्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विराज बहल म्हणाले, ‘अर्थमेड ऑर्गेनिक्समध्ये स्वच्छ व शाश्वत पर्यावरणासाठी काम करण्याची नैसर्गिक सवय – जगण्याचा ऑरगॅनिक मार्ग आमच्यात रूजला आहे. आम्ही विश्वासार्ह, जबाबदार पद्धतीने मिळवलेली आण प्रमाणित ऑरगॅनिक उत्पादने तयार करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. म्हणूनच आम्हाला मिलिंद सोमणसारख्या आपली जीवनशैली व खाद्यपदार्थांच्या निवडीतून शाश्वतता दर्शवणाऱ्या फिटनेस आयकॉनशी सहकार्य करताना अभिमान वाटत आहे. ग्रीन राइडसह आम्ही अधिक स्वच्छ जीवनशैलीचा प्रसार करण्याचे आमचे प्रयत्न आणखी विस्तारत आहोत.’

  लाइफलाँग ऑनलाइन रिटेल प्रा. लि. चे सह- संस्थापक भारत कालिया म्हणाले, ‘मिलिंद सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत! लाइफलाँग ऑनलाइन आणि मिलिंद एकत्रितपणे फिटनेसला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध शहरांतून सायकल भ्रमंती हा संपूर्ण चळवळीसाठी योग्य पर्याय आहे. आळसाशी लढणं म्हणजे योग्य दिशेने सुरुवात करणार आणि स्वतःला अधिक फिट बनवण्यासाठी प्रयत्न करणे.’