केंद्र सरकारनं महाराष्ट्राला बजेटमध्ये काय दिलं? बुलेट ट्रेनसह मुंबईच्या पदरात काय? घ्या जाणून

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी बुधवारी संसदेत अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. यामध्ये विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली. शिक्षण, रेल्वे, कृषी या क्षेत्रांसह इतर अनेक क्षेत्रांवर लक्ष देण्यात आले.

  मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी बुधवारी संसदेत अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. यामध्ये विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली. शिक्षण, रेल्वे, कृषी या क्षेत्रांसह इतर अनेक क्षेत्रांवर लक्ष देण्यात आले. पण या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला (Maharashtra) देखील भरभरून देण्यात आल्याचा दावा भाजपने (BJP) केला आहे.

  महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 16000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी 2014 च्या तुलनेत 10 पटीने वाढीव आहे. तसेच या निधीतून वर्धा – यवतमाळ – नांदेड, नगर – बीड – परळी – नागपूर – नागभीड हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यातील तीन रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचा मानस आहे, ही सर्व माहिती भाजपच्या वतीने देण्यात आली आहे.

  10 ‘वंदे भारत’ ट्रेन सुरु होणार

  याशिवाय वर्षभरात 10 वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रात सुरू होणार आहे. याशिवाय विदर्भ-मराठवाडा सिंचनासाठी 400 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. रस्ते सुधारणांसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  पुणे मेट्रोसाठी 1206 कोटींची तरतूद

  पर्यावरणपूरक पोक्रा प्रकल्पासाठी 600 कोटींचा निधी दिला जाणार आहे. तर पुणे मेट्रोसाठी 1206 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुळा-मुठा नदी शुद्धीकरणासाठी 246 कोटी निधी देण्यात येणार आहे.

  बुलेट ट्रेनसाठी 2000 कोटी

  या अर्थसंकल्पात बुलेट ट्रेनसाठी 2000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर मुंबई मेट्रोसाठी 500 कोटी दिले जाणार आहे. मुंबईच्या MUTP साठी 163 कोटी आणि ग्रीन मोबीलिटीसाठी 215 कोटी देण्यात येणार आहे.

  नागपूर मेट्रोसाठी 118 कोटी

  महाराष्ट्रात विविध प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर मेट्रोसाठी 118 कोटी दिले जाणार आहे. तर नागनदी शुद्धीकरणासाठी 224 कोटी देण्यात येणार आहेत.