ऐन लग्नसराईत सोने-चांदी महागणार; अर्थसंकल्पात केली ‘ही’ घोषणा, जाणून घ्या…

अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी देशातील महिलांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेटची घोषणा करण्यात आली. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

  नवी दिल्ली : 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Union Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, ऐन लग्नसराईच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ (Gold-Silver Prices Hiked) होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार, घोषणाही करण्यात आली आहे.

  गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात कपात होऊन दिलासा मिळेल, अशी आशा होती. मात्र, असे काही झाले नाही. अर्थमंत्री सीतारमण यांनी लिथियम-आयन बॅटरीच्या निर्मितीसाठी कस्टम ड्युटीमध्ये सूट दिली जाईल, अशी घोषणा केली आहे. याशिवाय टेक्सटाईल्स वगळता मूळ कस्टम ड्युटी दर 21 वरून 13 पर्यंत कमी केला जाईल. त्याचबरोबर सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आली. त्यामुळे सोने-चांदी आणि प्लॅटिनम महाग होणार आहे. याचा फटका ऐन लग्नसराईत सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बसणार आहे.

  देशातील महिलांसाठी आनंदाची बातमी

  अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी देशातील महिलांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेटची घोषणा करण्यात आली. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट उपलब्ध करुन दिले जाणार आहे. दोन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करुन दिले जाईल. 2 लाख रुपये एखादी महिला किंवा मुलीच्या नावे दोन वर्षांसाठी 7.5 टक्के व्याजदरावर गुंतवण्याची सुविधा यातून उपलब्ध केली जाणार आहे.

  पीएम आवास योजनेसाठी भरीव तरतूद

  पीएम आवास योजनेसाठी सरकारने भरीव तरतूद केली आहे. जे नागरिक अद्याप हक्काचं घर घेऊ शकले नाहीत. त्यांना या योजनेचा निश्चित फायदा होणार आहे. अर्थसंकल्पात पीएम योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आल्यामुळे अधिकाधिक लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सध्या शहरी तसेच ग्रामीण भागात हजारो नागरिक पीएम आवास योजनेचा लाभ घेत आहेत.