Dispute in Hinduja family over billions of rupees built in 107 years; 18 18 billion empire in crisis

    मुंबई : जगातील सर्वात मोठ्या व्यापार समूहांपैकी एक असलेल्या हिंदुजा समूहाचे साम्राज्य संकटात सापडले आहे. समूहाने 107 वर्षांत उभारलेल्या अब्जावधीच्या संपत्तीवरून हिंदुजा कुटुंबामध्ये अंतर्गत कलह भडकला आहे(Dispute in Hinduja family over billions of rupees built in 107 years; 18 18 billion empire in crisis). लंडन आणि स्वित्झर्लंडच्या न्यायालयांत एकीकडे हिंदुजा समूहाचे संस्थापक-अध्यक्ष श्रीचंद हिंदुजा यांच्या मुली आणि दुसरीकडे श्रीचंद यांचे तीन भाऊ असा लढा सुरू आहे. हिंदुजा हा 18 अब्ज डॉलर एवढे ऐश्वर्य असलेला ब्रिटिश-भारत व्यापार समूह आहे.

    समूहाच्या डझनभर कंपन्या असून त्यात हिंदुस्थानमध्ये सार्वजनिक रूपात व्यापार करणाऱ्या सहा संस्थांचा समावेश आहे. हा समूह भारतासहतब्बल 38 देशांमध्ये ट्रक बनविणे, बँकिंग, रसायन, वीज, मीडिया आणि आरोग्य सेवेमध्ये दीड लाखाहून अधिक लोकांना रोजगार देत आहे.

    85 वर्षीय श्रीचंद परमानंद ऊर्फ एस. पी. हिंदुजा हे सध्या स्मृतिभ्रंशाने त्रस्त आहेत. गेल्या वर्षी स्विस बँकेच्या सीईओपदी नियुक्त झालेले एस. पी. यांचे 31 वर्षीय नातू करम हिंदुजा यांनी जिनिव्हात दिलेल्या मुलाखतीनंतर कुटुंबात संपत्तीवरून सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे.

    मी लहानपणी लंडनमध्ये असताना माझे आजोबा श्रीचंद हिंदुजा यांच्यासोबत बॉलीवूडचे चित्रपट बघायचो. आठवड्यातून एकदा न विसरता आम्ही दोघे चित्रपट बघायला जायचो. मग तो चित्रपट चांगला असो वा वाईट, अशी आठवण करम यांनी मुलाखतीत सांगितली. मात्र ते दोघे वास्तविक जीवनात कौटुंबिक वादात अडकतील आणि हा वाद कुठल्याही बॉलीवूड कथानकापेक्षा अधिक मनोरंजक असेल याची त्यावेळी दोघांना शंकाही आली नसावी.

    हिंदुजा कुटुंबात संपत्तीवरून दोन गट आमने-सामने उभे ठाकले आहेत. हिंदुजा समूहाचे अध्यक्ष श्रीचंद हिंदुजा यांचा नातू करम व त्याची बहीण, आई, मावशी आणि आजी यांचा एक गट असून त्यांनी हिंदुजा समूहाच्या संपत्तीची वाटणी करण्याची आग्रही मागणी केली आहे. दुसरीकडे श्रीचंद यांचे तीन भाऊ गोपीचंद, प्रकाश आणि अशोक हिंदुजा यांनी हिंदुजा समूहाच्या संपत्तीची विभागणी करण्याला तीव्र विरोध केला आहे. समूहातील सगळ्या गोष्टी कुटुंबातील सर्वांच्या आहेत आणि कुठलीच गोष्ट कुणा एकाची नाही, या ब्रीदवाक्यावर श्रीचंद यांचे भाऊ ठाम आहेत.