सोने व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, सराफांना कर्जाची रक्कम सोने देऊन फेडण्याची मुभा

गोल्ड मेटल लोनची(Gold Metal Loan) परतफेड ही सध्या पैशांच्या माध्यमातून केली जाते. मात्र, रिझर्व्ह बँकेने आता या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

  मुंबई: केंद्र सरकारने देशातील सराफा व्यापारी आणि सोन्याची निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता सराफ आणि सोने व्यापाऱ्यांना पैसाऐवजी सोने (Gold) देऊन त्यांच्या गोल्ड (मेटल) लोनची (GML) परतफेड करता येणार आहे. मात्र, एका मर्यादेपर्यंत अशा स्वरुपात कर्ज फेडता येणार आहे.

  गोल्ड मेटल लोनची परतफेड ही सध्या पैशांच्या माध्यमातून केली जाते. मात्र, रिझर्व्ह बँकेने आता या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

  रिझर्व्ह बँकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बँकांनी गोल्ड लोनचा काही हिस्सा म्हणजे एक किलो किंवा त्यापेक्षा अधिक कर्जाची परतफेड सोन्याच्या स्वरुपात करण्याची मुभा कर्जदारांना दिली पाहिजे. मात्र, त्यासाठी रिझर्व्ह बँकेने काही अटी घालून दिल्या आहेत.

  रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सोन्याची आयात करणाऱ्या अधिकृत बँका आणि गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम २०१५मध्ये हिस्सेदारी असणारे अधिकृत बँक ज्वेलरी एक्स्पोटर्स आणि देशांतर्गत सोन्याच्या पेढ्यांना GML चा लाभ मिळू शकतो.

  स्थानिक पातळीवरील IGDS (India Good Delivery Standard)/ LGDS (LBMA’s Good Delivery Standards) सोन्याचा उपयोग करुन कर्जाची परतफेड होऊ शकते. कर्जदाराला परतफेडीसाठी देण्यात आलेला पर्याय, सोने कोणत्या स्वरुपात आणि त्यासाठी कोणत्या अटी असतील, या सगळ्याचा तपशील कर्जाच्या करारनाम्यात असला पाहिजे.

  Gold Monetization Scheme ही २०१५ साली सुरु झाली होती. गोल्ड (मेटल) लोनच्या पैशांचा वापर कोणत्या कारणांसाठी होतो यावर बँक देखरेख ठेवते. २०१५ पासून घरगुती दागिने आणि संस्थानांकडे असलेले सोने तारण ठेवण्याच्या योजनेला प्रारंभ झाला होता.