क्रिप्टोकरन्सीचा अधिकृत प्रवेश होण्यातील अडथळे, ‘RBI’चा सावधानतेचा पवित्रा

आर्थिक अस्थैर्य किंचित प्रमाणात जरी निर्माण झाले, तरी त्यातून राजकीय व सामाजिक स्थैर्याला तडे जाण्याची भीती, तसेच वित्तीय यंत्रणा कोसळण्याची जोखीम या बाबींमुळे धोरणकर्त्यांच्या मनात ‘क्रिप्टोकरन्सी’ (Cryptocurrency) विषयी चिंता निर्माण होत आहे.

  • ‘फिनटेक फेस्टिव्हल इंडिया 2021-22’च्या ‘मुंबई मायक्रो एक्सपीरियन्स’मध्ये महापात्रा यांची उपस्थिती
  • ‘फिनटेक फेस्टिव्हल इंडिया’ला नीति आयोग, सहा केंद्रीय मंत्रालये यांचे समर्थन, ‘कॉन्स्टेलर एक्झिबिशन्स’द्वारे आयोजित

मुंबई : “क्रिप्टोकरन्सी’ (Cryptocurrency) चा अधिकृत प्रवेश (Official Access) होण्यातील अडथळे, त्याच्या नियंत्रणासाठीच्या चौकटीचा अभाव आणि देशाबाहेरील शक्तींचा या चलनावर असलेला प्रभाव या तीन अतिशय गंभीर मुद्द्यांचा क्रिप्टो जगतात विचार होत नसल्यामुळे ‘क्रिप्टोकरन्सी’बाबत ‘RBI’ने सावधानतेचा पवित्रा घेतला आहे,” असे मत ‘आरबीआय इनोव्हेशन हबच्या गव्हर्निंग कौन्सिल’चे सदस्य, ‘नाबार्ड’च्या पर्यवेक्षण मंडळाचे सदस्य व भारतीय विमा सल्लागार परिषदेचे सदस्य मृत्युंजय महापात्रा यांनी आज येथे व्यक्त केले. ते ‘फिनटेक फेस्टिव्हल इंडिया 2021-22’च्या ‘मुंबई मायक्रो एक्सपीरियन्स’ येथे बोलत होते.

महापात्रा यांच्या म्हणण्यानुसार, “आर्थिक अस्थैर्य किंचित प्रमाणात जरी निर्माण झाले, तरी त्यातून राजकीय व सामाजिक स्थैर्याला तडे जाण्याची भीती, तसेच वित्तीय यंत्रणा कोसळण्याची जोखीम या बाबींमुळे धोरणकर्त्यांच्या मनात ‘क्रिप्टोकरन्सी’ विषयी चिंता निर्माण होत आहे.”

नवकल्पनांविषयी बोलतांना महापात्रा पुढे म्हणाले, “कडक नियमांमुळे नवकल्पना रोखल्या जाऊ नयेत किंवा त्यांची गळचेपीही होऊ नये, असा भारत सरकार आणि ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’चा दृष्टिकोन आहे. नाविन्यता ही नियमन केलेल्या परिसंस्थेमध्ये निर्माण व्हायला हवी की स्वायत्त परिसंस्थेत, हाच केवळ वादाचा मुद्दा आहे. मला वाटते की सरकार नवकल्पनांना काही अंशी वाव देईल आणि त्या पूर्णपणे खुल्या करण्याऐवजी, नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील शक्तींचे योग्य ते मापन करूनच त्यांना परवानगी देईल.”

‘कॉइनस्विच’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सिंघल म्हणाले, “क्रिप्टो स्वीकारण्यात आपण आणखी उशीर लावू शकत नाही. आपण ‘इंटरनेट 1.0’ची पहिली संधी यापूर्वीच घालवली आहे. आज कोणताही व्यवसाय सुरू करणाऱ्याला ‘ॲमेझॉन’ किंवा ‘गुगल’वर काम करावे लागते, तसेच कामाच्या वितरणासाठी ‘फेसबुक’, ‘ट्विटर’ किंवा ‘गुगल’चा वापर करावा लागतो. व्यवसाय सुरू होताच आपला 70 टक्के महसूल या कंपन्यांकडे जातो. आपण तंत्रज्ञानाचे निव्वळ आयातदार आहोत. दरवर्षी 10 अब्जाहून अधिक डॉलर्स मूल्याचे तंत्रज्ञान आपण आयात करतो आणि हे प्रमाण पुढील 3 ते 4 वर्षात 45 ते 30 अब्ज डॉलर्स इतके वाढण्याची शक्यता आहे. उद्याचे आयोजन ‘ॲमेझॉन’वर न करता ‘क्रिप्टो ब्लॉकचेन’वर व्हायला हवे, अशी संधी ‘क्रिप्टो’द्वारेच आपल्याला मिळू शकते. यातून आपल्याला केवळ अमर्यादीत संधीच नव्हे, तर डेटा सुरक्षा, डेटा संरक्षण आणि डेटा स्थानिकीकरणदेखील आपोआप मिळेल. भारताने ‘क्रिप्टोकरन्सी’च्या व्यवहारांमध्ये लवकर भाग घेतला व त्याची लवकर उभारणी केली, तर पुढील 10 वर्षांत भारत या तंत्रज्ञानाचा थेट निर्यातदार होऊ शकतो.”

या परिषदेत उपस्थित असलेले ‘ॲक्सिस बँके’चे कार्यकारी उपप्रमुख व मुख्य अर्थशास्त्रज्ञ सौगता भट्टाचार्य म्हणाले, “क्रिप्टो हा तेल, तांबे, सोने, इक्विटी यांसारखा एक पर्यायी गुंतवणूक वर्ग आहे; तसेच, क्रिप्टो हे एक जटिल स्वरुपाचे डेरिव्हेटिव्ह आहे.”

एक बँकर या नात्याने भट्टाचार्य म्हणाले, “जागतिक मध्यवर्ती बँकेच्या डिजिटल चलनांसह ‘क्रिप्टोकरन्सी’चे वातावरण विकसित होऊ लागले, तर बँकांसाठी अनेक बरे-वाईट परिणाम होतील. त्यामुळे बँकांना जागरुक राहणे आवश्यक आहे. या अनुषंगाने होणाऱ्या तांत्रिक बदलासाठी त्यांनी आपल्या यंत्रणेची रचना नव्याने करणेही गरजेचे आहे.”

‘फिनटेक फेस्टिव्हल इंडिया’चे आयोजन ‘कॉन्स्टेलर एक्झिबिशन’द्वारे (टेमसेक आणि सिंगापूर प्रेस होल्डिंग्सची उपकंपनी, जी सिंगापूर फिनटेक फेस्टिव्हल आयोजित करते) करण्यात आले आहे. ‘फिनटेक फेस्टिव्हल इंडिया’ला नीति आयोग आणि केंद्र सरकारच्या सहा मंत्रालयांचे समर्थन प्राप्त आहे.

मुंबईत आज दिवसभर सुरू असलेल्या या परिषदेला काही दिग्गज उद्योजकांनीही हजेरी लावली. यामध्ये ‘पेटीएम मनी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण श्रीधर, ‘इक्विटास स्मॉल फायनान्स बँके’च्या निओबँक, फिनटेक अलायन्सेस व डिजिटल बिझनेस या विभागांच्या राष्ट्रीय प्रमुख डॉ. जस्मिन गुप्ता, ‘स्पाईस मनी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार, ‘एलएक्सएमई’च्या संस्थापिका प्रीती राठी गुप्ता व अन्य मान्यरांचा समावेश होता.

‘वेल्थटेक’ श्रेणीचा उदय होण्याविषयी बोलताना ‘पेटीएम मनी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण श्रीधर म्हणाले, “भारतातील ‘वेल्थटेक’ व्यवसायासाठी पुढील दहा वर्षांचा काळ सर्वोत्तम असणार आहे. सर्वप्रथम, ‘रिटेल एयूएम’मधील 20 टक्के भाग हा व्यक्तींच्या थेट रोख्यांमध्ये गुंतविला जाईल. भारतीय गुंतवणूकदारांसाठी दुसरी मोठी गोष्ट म्हणजे ईटीएफ किंवा अप्रत्यक्ष गुंतवणूक; आणि तिसरी बाब अशी, की चॅनेलच्या बाजूने आणखी एक मोठा बदल होईल, जिथे ‘मी सांगतो’ वरून ‘आम्ही एकमेकांना सांगत आहोत’ या संकल्पनेकडे आपण जाऊ. यामध्ये अर्थात समाज ही संकल्पना अध्याहृत आहे. तसेच संपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्राला सोशल मीडियाच्या लाटेचा फटका बसेल.”

या प्रसंगी ‘एफएफआय’ची ‘नॉलेज पार्टनर’ असलेल्या ‘अर्न्स्ट अँड यंग’ (ईवाय) या संस्थेने तयार केलेल्या ‘मुंबई : मूव्हिंग फिनटेक्स थ्रू अ प्रो-ॲक्टिव्ह पॉलिसी अजेंडा’ या विषयावरील श्वेतपत्रिकेचे या परिषदेत प्रकाशन करण्यात आले. या श्वेतपत्रिकेमध्ये ‘मुंबई फिनटेक इकोसिस्टम’विषयी धोरणात्मक चौकटीच्या दृष्टीकोनातून सखोल माहिती देण्यात आली आहे. ‘फिनटेक स्टार्टअप्स’च्या वाढीसाठी सक्षम परिसंस्था तयार करण्यात या श्वेतपत्रिकेची मोलाची मदत होऊ शकेल.

‘फिनटेक फेस्टिव्हल इंडिया’ हा फिनटेक उद्योग एकत्र येण्याचा देशातील सर्वात मोठा उपक्रम आहे. येत्या मार्च 2022पर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. यात भारतीय व जागतिक स्तरावरील 500 हून अधिक दिग्गज व्यक्ती आणि 12 हजारांहून अधिक प्रतिनिधींचा सहभाग असेल. ‘एफएफआय’मध्ये ब्राझील, इस्रायल, ब्रिटन, रशिया, कॅनडा, फिनलंड, जपान, सिंगापूर आदी देश सहभागी होत आहेत.

या परिषदांना भारत सरकारचे अर्थ मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमईआयटीवाय), सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई), कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (वाणिज्य व उद्योग मंत्रालय), ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम – माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत) आणि स्टार्टअप इंडिया (भारतातील उद्योग आणि अंतर्गत व्यापार व गुंतवणूक वाढीसाठीचा विभाग) यांचा पाठिंबा लाभलेला आहे. तामिळनाडू सरकार, कर्नाटक सरकार आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ तामिळनाडू लिमिटेड’ (ईएलसीओटी) यांचेही समर्थन या परिषदांना मिळाले आहे.

‘फिनटेक फेस्टिव्हल इंडिया’चे आयोजन प्रत्यक्ष व डिजिटल स्वरूपात, 10 ‘मायक्रो एक्सपेरियन्स कॉन्फरन्सेस’च्या माध्यमातून हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, गुवाहाटी, चेन्नई, मुंबई, गिफ्ट सिटी (अहमदाबाद) आणि पुणे येथे केले जात आहे. नवी दिल्ली येथे 9 ते 11 मार्च 2022 या तीन दिवसांच्या कालावधीत एका मोठ्या कार्यक्रमांतर्गत या महोत्सवाची सांगता होईल.

पुढील ‘मायक्रो एक्सपीरियन्स’ दि. 17 डिसेंबर 2021 रोजी पुण्यात होणार आहे.

फिनटेक उद्योगाला देशभरात बळ देण्याचे ‘एफएफआय’चे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने सरकारव्यतिरिक्त, भारतीय विमा क्षेत्रातील दिग्गज संस्था ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ (एलआयसी) आणि ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई’ यांसह इतर उद्योगांचेही लक्ष ‘एफएफआय’ने वेधून घेतले आहे.