अजून किती लचके तोडणार! फोन पे चे कार्यालयही आता मुंबईबाहेर जाणार? ‘या’ राज्याला दिले प्राधान्य

महाराष्ट्रात अनेक बेरोजगार (unemployed) इंजिनिअर्स असून चेन्नईत जाहिरात दिल्यामुळे या तरुणांवर अन्याय झाला आहे. यातच भर म्हणून की काय आता मुंबईतील फोन पे या कंपनीचे कार्यालयही अन्य एका राज्यात जाणार आहे. याबाबत त्या कंपनीने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

  मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क

  गुगल पे (Google Pay) नंतर सर्वाधिक लोकप्रिय असलेली फोन पे ( PhonePe ) कंपनीने आपले मुंबईतील कार्यालय अन्य राज्यात हलवण्याचा निर्णय (Descision To Shift Other State) घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील शेकडो तरुणांवर बेरोजगारीचे संकट ओढवणार आहे (Due to this decision hundreds of youths in Mumbai will face the crisis of unemployment).

  महाराष्ट्रातून वेदांत (Vedanta) आणि बल्क ड्रग पार्क (Bulk Drug Park) हे दोन प्रकल्प अन्य राज्यात गेले आहेत. यामुळे २ लाख ७० हजार इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगार बुडाला आहे.

  दुसरीकडे वर्सोवा वांद्रे सी लिंकच्या (Versova Bandra Sea Link) कामाची कंपनी बदलण्यात आली असून या कंपनीने इंजिनिअर पदासाठीची जाहिरात चेन्नई येथे दिली आहे. यामुळे महाराष्ट्रातील तरुण या पदासाठी अर्ज करू शकत नाहीत. महाराष्ट्रात अनेक बेरोजगार (unemployed) इंजिनिअर्स असून चेन्नईत जाहिरात दिल्यामुळे या तरुणांवर अन्याय झाला आहे. यातच भर म्हणून की काय आता मुंबईतील फोन पे या कंपनीचे कार्यालयही अन्य एका राज्यात जाणार आहे. याबाबत त्या कंपनीने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

  फोन पे सेवेचा फायदा ग्रामीण भागातील अनेक उद्योजक, तरुण, सामान्य नागरिक यांना होत आहे. महाराष्ट्रातील लाखो नागरिक फोन पे या सेवेचे ग्राहक आहेत. मुंबईतील बोस्टन हाऊस, सुरेन रोड, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व) येथे फोन पे चे नोंदणीकृत कार्यालय आहे. हे कार्यालय शेजारील राज्यात हलविण्याबाबत फोन पे चे संचालक आदर्श नाहाटा यांच्या नावे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  फोन पे च्या या जाहिरातीमध्ये ‘फॉर्म नंबर INC-26 [कंपनी (समावेश) नियम, २०१४ च्या नियम ३० नुसार ] प्रादेशिक संचालक पश्चिम विभागासमोर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३ चा उप-विभाग (४) आणि कंपनी नियम, २०१४ च्या नियम ३० च्या उप-नियम (५) च्या खंड (a) च्या बाबतीत आणि PhonePe Private Limited चे नोंदणीकृत कार्यालय युनिट नंबर ००१, तळमजला, बोस्टन हाउस, सुरेन रोड, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई, महाराष्ट्र- ४०००९३ येथे आहे. याद्वारे सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की कंपनीने तिचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात बदलण्यास सक्षम होण्यासाठी, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज प्रस्तावित केला आहे. ज्यासाठी कंपनीच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफारची पुष्टी मिळावी यासाठी १६ ऑगस्ट, २०२२ येथे झालेल्या आमसभेत विशेष ठराव मंजूर करण्यात आला असे म्हटले आहे.

  तसेच, कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलामुळे कोणत्याही व्यक्तीचे हित प्रभावित होण्याची शक्यता
  असेल तर (www.mca.gov.in) वर गुंतवणूकदार तक्रार फॉर्म दाखल करू शकते किंवा कारण देऊ शकते. रजिस्टर पोस्टाने त्याचे/तिचे हिताचे स्वरूप सांगणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह समर्थित आणि विरोधाच्या कारणासह असलेले पत्र प्रादेशिक संचालक, पश्चिम विभाग कडे एव्हरेस्ट ५ वा मजला १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई, महाराष्ट्र- ४००००२ या पत्त्यावर, ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून चौदा दिवसांच्या आत देण्यात यावे असेही या जाहिरातीमध्ये म्हणण्यात आले आहे.

  फोन पे कंपनीने मुंबईतून कर्नाटक राज्यात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला असला तरी येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काय होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.