रमेश चौहान यांनी ‘बिसलेरी इंटरनॅशनल’ टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडला विकली

    थम्स अप, गोल्ड स्पॉट आणि लिम्का हे शीतपेय ब्रँड कोका-कोलाला विकल्यानंतर जवळपास तीन दशकांनंतर रमेश चौहान यांनी ‘बिसलेरी इंटरनॅशनल’  टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) ला विकली आहे. हा करार 7,000 कोटींना झाला. इकॉनॉमिक टाईम्सने याबाबत एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. चौहान यांनी सांगितलं की, बिस्लेरीला विस्ताराच्या पुढील स्तरावर नेण्यासाठी त्यांच्याकडे उत्तराधिकारी नाही.

    रमेश चौहान यांची मुलगी जयंती वयाच्या 24 व्या वर्षी बिस्लेरीमध्ये रुजू झाली. त्यांनी तळागाळात सुरू केलेल्या दिल्ली कार्यालयाचा पदभार स्वीकारला. त्यांनी कारखान्याचे नूतनीकरण केले. 2011 मध्ये त्यांनी मुंबई कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला. नवीन उत्पादनांच्या विकासाबरोबरच, ती जुन्या उत्पादनांच्या ऑपरेशनला सुव्यवस्थित करण्यात देखील सामील होती. जयंतीने लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून फॅशन स्टाइलिंग आणि फोटोग्राफीचे धडे घेतले आहेत. बिस्लेरी ही भारतातील सर्वात मोठी पॅकेज्ड वॉटर कंपनी आहे.

    करारानुसार, सध्याचे व्यवस्थापन दोन वर्षांसाठी सुरू राहील. रमेश चौहान पुढे बोलताना म्हणाले की, टाटा समूह अधिक चांगल्या पद्धतीने बिसलेरी ब्रँड पुढे नेईल. तथापि, बिसलेरी विकणे हा एक वेदनादायक निर्णय होता. मला टाटा संस्कृती आवडते आणि त्यामुळे इतर खरेदीदार असूनही मी टाटा निवडले. रिलायन्स रिटेल, नेस्ले आणि डॅनोनसह बिस्लेरी खरेदी करण्यासाठी अनेक दावेदार असल्याचे सांगण्यात येत आहे.

    50 वर्षांच्या कारकिर्दीत, चौहान यांनी बिस्लेरीला भारतातील शीर्ष मिनरल वॉटर ब्रँड बनवले. चौहान यांनी वेदिका हा प्रिमियम नॅचरल मिनरल वॉटर ब्रँडही तयार केला आहे. याशिवाय चौहान थम्सअप, गोल्ड स्पॉट, सित्रा, माझा आणि लिम्का यांसारख्या अनेक ब्रँडचे निर्माते आहेत.