आता ‘अळणी’ खाल्ल्याने तुमचा ‘बीपीही’ होऊ शकतो वर-खाली; जाणून घ्या नेमकं प्रकरण

हवामान विभागाने वर्तविलेल्या भाकितानुसार, जर मान्सून जूनच्या पहिल्या पंधरा दिवसांत दाखल झाला तर मीठाच्या उत्पादनात (Salt Production) घट होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिल्या आठवड्यात पाऊस झाला होता. यंदा पाऊस (Rain) लवकर हजेरी लावणार असल्याने त्याचा परिणाम मीठाच्या उत्पादनावर होणार आहे.

  मुंबई :  कोरोना (Corona Virus) कमी झाल्यानंतर महागाईचा (Inflation) आगडोंब आधीच उसळला असल्याने गरीबांना दोन वेळचे पुरेसे अन्न मिळेनासे झाले आहे. देशातल्या गरीबांना एकवेळच्या जेवणाची जुळवाजुळव करताना नाकी दम आला आहे. आता त्यांना पूर्वीच्या काळी गरीब लोक जसे मीठासोबत भाकरी खायचे तशी वेळ येऊन ठेपली आहे. पण नशीबाने इथेही त्यांची थट्टाच मांडली आहे. महागाईची मीठावरही (Salt) वक्रदृष्टी पडली आहे. येत्या काही दिवसांत गरीबांसाठी मीठाची चव बेचव होणार आहे. मीठाचे भाव वाढल्याने (Salt Price Hike) अनेकांच्या घरातील स्वयंपाक हा ‘अळणी’ होणार आहे. बातमीच तशी आहे कारण मीठाचे उत्पादन ३० टक्क्यांनी घटणार आहे. जाणून घेऊया नेमकं प्रकरण.

  भारतात सर्वाधिक मीठाचे उत्पन्न गुजरात राज्यात होते. यावर्षी मान्सून वेळेआधी दाखल होणार असून गेल्यावर्षी तो खूप विलंबानेच दाखल झाला होता. त्यामुळे उत्पादनाचा कालावधी खूप कमी उरला आहे. याचा परिणाम थेट उत्पादनावर होणार आहे. उत्पादन घटल्याने साहजिकच मीठाच्या किंमतीत वाढ होणार आहे. त्यामुळे महागाईला आणखीन मीठाची फोडणीच बसणार आहे.

  तसं पाहता गुजरातमध्ये मीठाचे उत्पादन दरवर्षी ऑगस्टमध्ये सुरू होते. मात्र मान्सून लांबल्याने गेल्यावर्षी मीठाच्या उत्पादनालाही उशीरच झाला. समुद्र किनारी क्षेत्रात यंदा एप्रिल महिन्याच्या मध्यात उत्पादन सुरू झाले. त्यामुळे उत्पादनात आधीच घसरण झाली होती. गेल्या वर्षी पावसाने ऑक्टोबर महिन्यात हजेरी लावल्याने मीठाचे उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना खूपच कमी अवधी मिळाला होता.

  मीठ उत्पादनात भारताचा लागतो तिसरा क्रमांक

  दरवर्षी गुजरात राज्यात मीठाचे उत्पादनाला ऑगस्ट महिन्यात सुरुवात होते. जर यंदा मीठाच्या उत्पादन घसरण झाली तर केंद्र सरकार मीठाच्या निर्यातीवर निर्बंध लावू शकते. भारतात दरवर्षी ३ कोटी टन मीठाचे उत्पादन होते. अमेरिका आणि चीन नंतर मीठागारातून मीठ उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. इतकेच नाही तर भारत जगातील ५५ देशांना मीठाची निर्यात करुन तिथल्या लोकांचे जेवण चविष्ट करतो.

  देशातील एकूण मीठ उत्पादनात एकट्या गुजरात राज्याचा वाटा ९० टक्के इतका आहे. म्हणजे देशवासीय गुजरातच्या मीठाचा वापर करुन जेवणाची लज्जत वाढवितात. आता या एकूण मीठ उत्पादनातील १ कोटी टन मीठाची जगभरात निर्यात करण्यात येते. एक कोटी २५ लाख टन मीठाचे वितरण जगभरात करण्यात येते.