share market

आज शेअर बाजारातील (Share Market) व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २०७.१५ अंकांच्या घसरणीसह ६१,४५६.३३ अंकांवर सुरु झाला. त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६१.२५ अंकांच्या घसरणीसह १८,२४६.४० अंकांवर खुला झाला.

    मुंबई: शेअर बाजारात (Share Market) आज घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. बाजारात विक्रीने जोर धरला आहे. शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा काही प्रमाणात तेजी होती. मात्र, त्यानंतर बाजारात घसरण जाणवली. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीत (Nifty) आज पडझड झाल्याचं पाहायला मिळालं. आयटी, पॉवर, एनर्जी आणि ऑईल आणि गॅस सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसत आहे.

    आज बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २०७.१५ अंकांच्या घसरणीसह ६१,४५६.३३ अंकांवर सुरु झाला. त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६१.२५ अंकांच्या घसरणीसह १८,२४६.४० अंकांवर खुला झाला. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स ४६० अंकांच्या घसरणीसह ६१,२०२.४ अंकांवर पोहोचला होता तर, निफ्टी १३४.२० अंकांच्या घसरणीसह १८,१७३.४५ अंकांवर आला होता.

    शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर काही वेळात सेन्सेक्स निर्देशांकातील ३० पैकी ५ शेअर दरात तेजी दिसून आली होती. तर, २५ कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. निफ्टी निर्देशांकातील ५० पैकी फक्त १३ कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसत असून ३७ कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.

    सेन्सेक्स निर्देशांकातील भारती एअरटेल, मारुती, टाटा स्टील, हिंदुस्तान लिव्हर, महिंद्रा इत्यादी कंपनीच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, एनटीपीसी, पॉवरग्रीड, टायटन, एल अँड टी, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, व्रिपो आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.