टाटा पॉवर सोलरला मिळाली भारतातील सर्वात मोठी सौर ईपीसी ऑर्डर

    मुंबई : भारतातील एक सर्वात मोठी एकात्मिक सौर कंपनी आणि टाटा पॉवरच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी टाटा पॉवर सोलरला भारतातील सर्वात मोठी सौर ईपीसी ऑर्डर मिळाली आहे. एसजेव्हीएन लिमिटेडने टाटा पॉवर सोलरकडे ५५०० कोटी रुपयांची १ गिगावॅटची ईपीसी ऑर्डर दिली आहे.

    ‘मेक इन इंडिया’ सेल्स आणि मोड्यूल्सचा अभिनव वापर डोळ्यासमोर ठेवून या ईपीसी ऑर्डरची रचना करण्यात आली आहे. हा प्रोजेक्ट एमएनआरईच्या सीपीएसयू योजनेअंतर्गत विकसित करण्यात आला असून २४ महिन्यात पूर्ण होईल. राजस्थानातील ५००० एकरांहून जास्त जागेवर हा प्रकल्प विस्तारलेला असणार आहे. २२,८७,१२८ किलो कार्बन उत्सर्जनामध्ये घट करणे आणि दरवर्षी जवळपास २५०० मिलियन युनिट्स वीज निर्मिती करणे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

    कंपनीने संपादन केलेल्या या यशाबद्दल टाटा पॉवरचे सीईओ व एमडी डॉ. प्रवीर सिन्हा यांनी सांगितले, “एसजेव्हीएनने हा मेगा सौर प्रकल्प आमच्याकडे सोपवला याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. इतक्या प्रचंड मोठ्या प्रकल्पाची अंमलबजावणी देशात शुद्ध आणि हरित उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठीची आमची वचनबद्धता दर्शवते आणि आघाडीची सोलर ईपीसी कंपनी म्हणून आमचे स्थान मजबूत करते.”

    इतकी प्रचंड मोठी व्याप्ती असलेल्या शुद्ध ऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी करून ते सुरु करण्यात टाटा पॉवर सोलर नेहमीच आघाडीवर असते. १ गिगावॅटची ही ऑर्डर मिळाल्यामुळे आता टाटा पॉवरची ऑर्डर बुकिंग १२००० कोटी रुपयांच्या वर पोहोचली असून त्यांच्या एकत्रित पोर्टफोलिओमध्ये ९.३ गिगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या युटिलिटी स्केल शुद्ध ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे.