पंतप्रधान कार्यालय प्रगती पोर्टलच्या माध्यमातून मुंबई ऊर्जा मार्गावर (MUML) ठेवणार देखरेख

२०२० नंतर मुंबईत झालेल्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमुळे, सीईएने शहरातील अंतर्गत वीजनिर्मिती वाढवण्याची गरज स्पष्टपणे अधोरेखित केली आहे. त्याचप्रमाणे पारेषण जाळ्यांची क्षमता वाढवण्यावरही भर दिला आहे. ऊर्जेच्या वाढत्या मागणीमुळे सध्या या जाळ्यांवर मोठा ताण येत आहे.

  • मुंबई ऊर्जा मार्गाची अंमलबजावणी झाल्यानंतर एमएमआरमधील विजेची स्थिती मूलगामी रितीने सुधारणार

मुंबई : मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड (MUML) हा मुंबईतील महत्त्वाचा ऊर्जा पारेषण संरचना प्रकल्प (Power Transmission Infrastructure Project) आता प्रगती पोर्टलचा भाग झाला आहे (Part Of Pragati Portal). प्रगती पोर्टल हा एक मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म (Monitoring platform) असून, माननीय पंतप्रधान (Prime Minister, Narendra Modi) या प्लॅटफॉर्मद्वारे, राष्ट्रीय महत्त्वाच्या राज्य व केंद्रीय प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवतात. प्रकल्पाशी संबंधितांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधून माननीय पंतप्रधान प्रकल्पांवर देखरेख ठेवतात.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था प्रचंड वेगाने वाढत आहे आणि आगामी काळात राज्यातील ऊर्जेची मागणी अभूतपूर्व प्रमाणात वाढणार आहे. राज्य लवकरच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी सज्ज होत आहे. २०१९-२०च्या उन्हाळ्यात ऊर्जेच्या मागणीने ३,६०० मेगावॅट्सचा उच्चांक गाठला होता आणि २०२४-२५ पर्यंत ही मागणी ५,००० मेगावॅट्सपर्यंत, तर २०३० पर्यंत ६,००० मेगावॅट्सपर्यंत जाणे अपेक्षित आहे. परंतु, ऊर्जेच्या मागणी व पुरवठ्यात मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) अपुऱ्या पारेषण जाळ्यामुळे मोठी तफावत राहत आहे, असे केंद्रीय वीज प्राधिकरणाने (सीईए) स्पष्ट नमूद केले आहे.

२०२० नंतर मुंबईत झालेल्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमुळे, सीईएने शहरातील अंतर्गत वीजनिर्मिती वाढवण्याची गरज स्पष्टपणे अधोरेखित केली आहे. त्याचप्रमाणे पारेषण जाळ्यांची क्षमता वाढवण्यावरही भर दिला आहे. ऊर्जेच्या वाढत्या मागणीमुळे सध्या या जाळ्यांवर मोठा ताण येत आहे. या परिस्थितीचा विचार करता, मुंबई प्रदेशात चोवीस तास वीजपुरवठा होत राहील हे निश्चित करण्यासाठी पारेषण जाळे तातडीने अद्ययावत करण्याची गरज आहे.

एमयूएमएल सक्रिय झाल्यानंतर, हा मार्ग २००० मेगावॅटहून अधिक अतिरिक्त विजेचे वहन एका आंतरराज्य पारेषण प्रणालीच्या (आयएसटीएस) फीडमार्फत एमएमआर भागाला करेल तसेच सध्याच्या संरचनेचे अद्ययावतीकरण व दुरुस्त्यांची कामेही या प्रकल्पाद्वारे केली जातील. प्रगती पोर्टलमधील समावेश हा एमयूएमएल प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आहे, कारण, यामुळे महत्त्वाच्या समस्या सोडवण्यात तसेच प्रकल्पाच्या विकासाला वेग देण्यात मदत होईल. त्यामुळे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाईल आणि या वीजेचे प्रेषण डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू झालेले असेल.

तंत्रज्ञानसक्षम देखरेख आणि प्रकल्प व योजनांच्या वक्तशीर अंमलबजावणीमार्फत सक्रिय प्रशासनाची संस्कृती विकसित करण्याच्या दृष्टीने प्रगतीची रचना करण्यात आली आहे. संबंधितांची रिअल-टाइम उपस्थिती व त्यांच्यात होणारे आदानप्रदान यांच्या माध्यमातून पारदर्शकता व उत्तरदायित्वाची ही एक ठोस प्रणाली आहे. प्रगती बैठकांच्या आत्तापर्यंत झालेल्या ४० आवृत्त्यांमध्ये, एकूण १५.४१ लाख कोटी रुपये खर्चाच्या, ३१९ प्रकल्पांचे परीक्षण करण्यात आले आहे.

एमयूएमएलचे प्रकल्प संचालक निनाद पितळे प्रकल्प विकासातील या महत्त्वाच्या टप्प्याबाबत म्हणाले, “हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे हे या टप्प्यामुळे स्पष्ट होते. यामुळे आम्हाला सातत्याने प्रगती करत राहण्यात तसेच कामाची सुरुवात वेळापत्रकानुसार होईल याची खातरजमा करण्यात मदत होईल. ऊर्जेची वाढती मागणी या प्रकल्पाद्वारे पूर्ण होणार आहे आणि ऊर्जेच्या मागणीसंदर्भात भविष्यकाळासाठी सज्ज राहण्यात याची मदत होणार आहे.”

एमयूएमएल हा एक आंतरराज्य पारेषण प्रकल्प असून, भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या संकल्पनेतून हा प्रकल्प सुरू झाला आहे व त्याला मंजुरीही ऊर्जा मंत्रालयानेच दिली आहे. हा पारेषण प्रकल्प वेस्टर्न रिजन स्ट्रेंथनिंग स्कीम – चौदाचा (WRSS-XIX) एक भाग म्हणून राबवला जात आहे. मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेडद्वारे (पूर्वीचे नाव वापी टू नॉर्थ लखीमपूर ट्रान्समिशन लिमिटेड) या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. हे स्टरलाइट पॉवरने जून २०२० मध्ये टेरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव बिडिंग (टीबीसीबी) मार्गाने अधिग्रहित केलेले स्पेशल पर्पज व्हेईकल आहे. या प्रकल्पात तीन घटक आहेत, ते पुढीलप्रमाणे: पडघा-खारघर ४०० केव्ही डी/सी पारेषण लाइन, एलआयएलओ पडघा-नवी मुंबई ४०० केव्ही डी/सी पारेषण लाइन आणि एलआयएलओ आपटा-कळवा/तळोजा २२० केव्ही पारेषण लाइन.