करिअरची संधी : हेअर स्टाईलिस्टच्या वाटा

पूर्वी अभ्यासात गती नसलेले अनेकजण बाकी काही जमत नाही म्हणून केशकर्तन वगैरे शिकत असत. पण, आता ही परिस्थिती बदलते आहे. केशकर्तन आणि केशभूषा हा विषय करिअरसाठी महत्त्वाचा झालेला आहे.

पूर्वी अभ्यासात गती नसलेले अनेकजण बाकी काही जमत नाही म्हणून केशकर्तन वगैरे शिकत असत. पण, आता ही परिस्थिती बदलते आहे. केशकर्तन आणि केशभूषा हा विषय करिअरसाठी महत्त्वाचा झालेला आहे. या क्षेत्राला आता बरेच ग्लॅमरही मिळते आहे. पण यात कष्ट खूप आहेत, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. केशभूषाकाराला केस, त्यांचे वळण, वाढ, लांबी, रंग, पोत या सगळ्याचा बारकाईने अभ्यास करावा लागतो.

-हेअरड्रेसिंग ऑपरेटर किंवा असिस्टंट

या पातळीवर केस बारीक कापणे, स्ट्रेट लाइनसारखे बेसिक कट येणे, पुरुषांचे केस कापता येणे, केसांना शाम्पू, कंडिशनिंग करून देणे, डोक्याला मसाज करणे, ब्लो ड्राय, केसांना रंग लावता येणे या गोष्टी उमेदवाराला येणे अपेक्षित असते.

-हेअरड्रेसर, स्टायलिस्ट

ग्राहकाच्या गरजेनुसार त्याच्या केसांचा पोत, रंग, लांबी लक्षात घेऊन ते कापणे, त्याचे स्ट्रेटनिंग, पार्मिग इ करणे. केसांना रंग लावण्याच्या क्रियेची सर्व माहिती असणे, त्याचा योग्य तिथे वापर करता येणे, गरजेचे असते.

-कलरिस्ट

या क्षेत्रात केसांना रंग देण्याच्या प्रावीण्याचा विशेष अभ्यास असावा लागतो. रंगाची थिअरी, त्यांचे मिश्रण, केसांवर दिसून येणारा परिणाम, केसात नको असणारा रंग दडवणे, वेगवेगळ्या सिझनप्रमाणे नवे ट्रेंड तयार करण्यासाठी कलरिस्ट नेमले जातात.

-सिनिअर स्टायलिस्ट

सलोनसाठी लुक्स ट्रेंडस् सेट करणे. त्यासाठी टीम बनवून काम करणे, हे यांचे काम. या पदाची जबाबदारी मोठी असते. कधीकधी खुद्द सलोनचा मालकही सिनिअर स्टायलिस्ट असू शकतो. काही सिनिअर स्टायलिस्ट तर इतर सलोन्सनाही ट्रेनिंग देतात. सिनिअर स्टायलिस्टचे स्वत:चे ग्राहक असतात. त्यांनी केलेल्या कामाचे दरही बाकीच्यांपेक्षा जास्त असतात.

-अभ्यासक्रम आणि शिक्षण

हेअर ड्रेसिंगसाठी सर्टिफिकेशन बोर्ड- नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कौन्सिल ही सरकारची संस्था आहे. यातील सौंदर्य आणि प्रसाधन क्षेत्राशी निगडित असलेली संस्था म्हणजे ब्युटी अँड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल. या दोन्ही संस्था स्वायत्त आहेत. या दोन्ही संस्था सरकारमान्य अभ्यासक्रम चालवतात. त्याचप्रमाणे इन्स्टिट्यूट ऑफ हेअर ड्रेसर्स अँड ब्युटीशियन आणि सिटी अँड गिल्ड या खासगी संस्थाही मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात.

-रोजगाराच्या संधी

आज अनेक हेअर केमिकल आणि हेअर केअर कंपन्यांना प्रॉडक्ट नॉलेज ट्रेनर, टेक्निकल ट्रेनर्स, रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी ऑपरेटर्सची गरज असते. पंचतारांकित हॉटेल्समध्येही विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. क्रूझवरील सलोन्समध्येही काम करता येऊ शकते. यातून विदेशी ग्राहकांसोबत काम करणे, शिष्टाचारांचे पालन अशा गोष्टी शिकता येतात. तसेच अनेक देश फिरता येतात. ब्रँड कंपनीच्या प्रोडक्ट ट्रेनिंगसाठी टेक्निकल ट्रेनर म्हणून संधी मिळते. सिनेविश्‍वात सिनेमांसाठी तसेच कलाकारांसाठी व्यक्तिगत स्टायलिस्ट, हेअर ड्रेसर म्हणून काम करता येते. ट्रेनिंग अँकेडमीत नोकरी मिळू शकते. तसेच स्वत:च्या व्यवसायाचीही नामी संधी असते.