करिअरच्या वाटा : इंटरनेटचे कायदा अधिकारी

इंटरनेट ही सध्याची अत्यंत आवश्यक बाब आहे. भविष्यात जो इंटरनेट वापरू शकत नाही तो अडाणी ठरेल, अशी परिस्थिती आली आहे. जग जवळ आणण्यामागे ज्या गोष्टींचा प्रत्यक्ष हातभार आहे.

इंटरनेट ही सध्याची अत्यंत आवश्यक बाब आहे. भविष्यात जो इंटरनेट वापरू शकत नाही तो अडाणी ठरेल, अशी परिस्थिती आली आहे. जग जवळ आणण्यामागे ज्या गोष्टींचा प्रत्यक्ष हातभार आहे. इंटरनेट हे त्यापैकीच म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. इंटरनेट हे माध्यम दिवसेंदिवस वेगाने विकसित होत आहे. बँकिंग, व्यवसाय याप्रमाणे कित्येक ठिकाणी इंटरनेटच्या माध्यमामुळे वेळ वाचतो. म्हणूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्याचा वापरही झपाट्याने वाढतोय.

झपाट्याने वाढणाऱ्या या सायबर क्षेत्रात फेसबुक, ट्विटर, गुगल प्लस यासारख्या सोशल नेटवर्किंग साइट्मुळे उलाढाली करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. कम्प्युटरचे बेसिक ज्ञान असलेली व्यक्ती ते अगदी एक्स्पर्ट कम्प्युटर हॅकर यापैकी कोणीही इंटरनेटवर गुन्हा करण्याची क्षमता बाळगतो.

सायबर गुन्हे करणाऱ्यापासून इंटरनेट सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर लॉ अर्थात इंटरनेटचा कायदा ही नवीन संकल्पना अस्तित्वात आली. सायबर जग हे पूर्णपणे वेगळेच जग असून, त्यात जागतिक स्तरावर सहज पोहोचण्याची क्षमता आहे. त्यामुळे याबाबतचे कायदेदेखील जागतिक पातळीचे करण्यात आले आहेत. प्रत्येक देशाला थोड्या फार फरकाने ते पाळावेच लागतात. भारताच्या आयटी अ‍ॅक्ट २००० नुसार हॅकिंग, क्रेडिट कार्डचे दुरुपयोग, सायबर पाळती, सायबर चोरी किंवा पायरसी इत्यादी गोष्टी सायबर गुनंमध्ये येतात आणि असे गुन्हे लोकांच्या इंटरनेट वापराबरोबर वाढल्याने सायबर वकील किंवा कायदाधिकारी हा नवीन व्यवसाय उदयास आला आहे.

आवश्यक गुण

संगणकी किडे असणाऱ्यांसाठी हा व्यवसाय आहे. छोट्यातला छोटा बारकावा शोधून त्याला अभ्यासपूर्वक तपासून त्यावर पटकन अंमलबजावणी करता आली पाहिजे. संगणक आणि इंटरनेटच्या प्रगत होणाऱ्या नवनवीन प्रगत तांत्रिक बाबींबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक असते. अद्ययावत संगणकी ज्ञानाबरोबरच रोज बदलणाऱ्या इंटरनेट जगाचे पुरेपूर ज्ञान असणेही अपरिहार्य असते. बारावीनंतर सायबर लॉमध्ये बरेच छोटे-मोठे कोस्रेस करता येतात. पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी मात्र एलएलबीची डिग्री असणे आवश्यक असते. फार किचकट परिस्थितीतही तत्परतेने आणि कुशल काम करता येणे आवश्यक असते. म्हणूनच या व्यवसायात गुणवत्तेकडे गंभीरतेने पाहिले जाते.

उत्पन्न

सामान्यत: एखाद्या फर्ममध्ये सायबर वकील म्हणून काम करण्याचे १५ ते २० हजार इतके उत्पन्न मिळते. मोठ्या कॉर्पोरेट लॉ फर्म किंवा कंपन्यांमध्ये नोकरी मिळाल्यास हीच कमाई २० ते ४० हजारांच्या घरात जाते.

अभ्यासक्रम

या क्षेत्रात काम करण्यासाठी विविध पातळीवरच्या वेगवेगळ्या कायद्यांची माहिती करून घ्यावी लागते. त्यासाठी हा विषय अभ्यासताना वैयक्तिक कायदा, टेलिकॉम कायदा, कंपनी कायदे तसेच बौद्धिक मालमत्तेचे कायदे आणि गुन्हे यांचा अभ्यास शिकवला जातो. हे विषय ई-बिझनेस म्हणजेच इतर इंटरनेट व्यावसायाबरोबरही शिकवले जातात.

कामाचे स्वरूप

सायबर वकिलाला वेगवेगळे सायबर गुन्हे शोधून ते मोडीत काढावे लागतात. तसेच अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी सायबर गुन्ह्यांच्या वेगवेगळ्या पैलूंची आणि बारकाव्यांची माहिती असणे, महत्त्वाचे असते.

व्यवसायातील पदव्या

सायबर कन्सल्टंट इन आयटी फर्म, पोलिस आणि बँक, रिसर्च असिस्टंट इन लॉ फर्म, रिसर्च असिस्टंट इन टेक्नॉलॉजी फर्म, वेब डेवलपरचे सल्लागार, अ‍ॅडव्हायझर इन मिनिस्ट्री ऑफ आयटी किंवा कॉर्पोरेट हाउसेस, लॉ स्कूल्स किंवा मल्टिनॅशनल कॉर्पोरेशन्स