Corona's blow to exams postponed medical course exams; Decision of Maharashtra University of Health Sciences

मार्चपासून दुसऱ्या टप्प्यात पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू झाल्या असून, सध्या त्या परीक्षा सुरू आहेत. मात्र राज्यातील कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यात सुरू होणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत होती.

  मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हिवाळी सत्राच्या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला आहे. २३ मार्चपासून सुरू होणाऱ्या या परीक्षा १९ एप्रिलपासून घेण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील जवळपास ४५ ते ५० हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.muhs.ac.in या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर १५ मार्चला जाहीर करण्यात येणार आहे.

  कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा विलंबाने जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जानेवारी ते मार्चदरम्यान सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा तीन टप्प्यामध्ये जाहीर करण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ४ जानेवारीला सुरू होऊन पूर्ण झाल्या.

  त्यानंतर ८ मार्चपासून दुसऱ्या टप्प्यात पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू झाल्या असून, सध्या त्या परीक्षा सुरू आहेत. मात्र राज्यातील कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यात सुरू होणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत होती.

  याची दखल घेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे केलेले लॉकडाऊन, महाविद्यालयांमध्ये कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि प्रथम व द्वितीय वर्ष परीक्षांचे उन्हाळी २०२० परीक्षांचे काही विद्याशाखांची निकाल प्रक्रिया सुरू असल्याने विद्यापीठ प्रशासनाने पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

  या परीक्षा १९ एप्रिलपासून या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या लेखी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक १५ मार्चपासून विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली. विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भात कोणत्याही अफवांवर किंवा सामाजिक माध्यमांवर विश्वास न ठेवता परीक्षा संदर्भातील अद्ययावत माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

  उन्हाळी २०२० प्रथम वर्ष एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. पुरवणी परीक्षा ३ ते १५ मे दरम्यान होणार आहे. या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना ५ एप्रिलपर्यंत विद्यापीठाकडे अर्ज सादर करायचे आहेत. तर विलंब शुल्कासह १२ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.