महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा पुढे ढकलली, सुधारित तारखा जाहीर

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असेही २६ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले होते. आज काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे नमूद करण्यात आले आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० या परीक्षेची तारीख पूर्वी २० सप्टेंबर २०२० होती त्या ऐवजी ही परीक्षा नवीन सुधारित दिनांकानुसार ११ ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ही पूर्वी निश्चित केलेल्या तारखेनुसार ११ ऑक्टोबरला घेण्यात येणार होती ती आता नव्या तारखेनुसार २२ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात येईल तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नसून त्याच तारखेला १ नोव्हेंबर २०२० रोजीच ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.