नोकरी बदलण्याचा विचार करताय?; मग आधी हे वाचा

वर्षाच्या सुरूवातीचे पहिले तीन महिने खरंतर नोकरी शोधण्याच्या दृष्टीने चांगले आहेत. कारण वर्ष संपता संपताच अनेक कंपन्याच्या नव्या वर्षाच्या बजेटशी निगडीत गोष्टी ठरू लागतात.

  खाजगी क्षेत्रात नोकरी करणारे अनेक कारणांसाठी आपली नोकरी बदलतात. प्रगती करण्यासाठी हे बऱ्याचदा आवश्यकही असते, परंतु नोकरी सोडण्यासाठी कुठला कालावधी उत्तम आहे याची माहिती असणे आवश्यक आहे.

  जानेवारी, फेब्रुवारी, मार्च

  वर्षाच्या सुरूवातीचे पहिले तीन महिने खरंतर नोकरी शोधण्याच्या दृष्टीने चांगले आहेत. कारण वर्ष संपता संपताच अनेक कंपन्याच्या नव्या वर्षाच्या बजेटशी निगडीत गोष्टी ठरू लागतात. अशावेळी पगार आणि हायरिंगबाबतचे निर्णयही कंपनीकडून आधीच घेतले जातात. त्यानुसार या तीन महिन्यांमध्ये बऱ्याच कंपन्यामध्ये जॉब ओपनिंग असतात. याच काळात मार्केटमध्ये प्रोफाईलनुसार जास्त चांगली नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता असते.

  एप्रिल, मे आणि जून

  जर तुम्ही पहिल्याच नोकरीच्या शोधात असाल किंवा चांगल्या प्रोफाईल आणि पगाराच्या शोधात असाल तर एप्रिल, मे आणि जून हे महिने बेस्ट आहेत. कारण याच महिन्यांदरम्यान अनेक लोक आपला जॉब बदलतात. ज्यामुळे साहजिकच बऱ्याच कंपन्यांमध्ये वेकन्सीज निघतात. एवढंच नाहीतर वेकन्सीसाठी अप्लाय केल्यावर तुम्हाला चांगला पगारही ऑफर करण्यात येऊ शकतो.

  जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर

  हे तीन महिने मात्र नवीन नोकरी शोधण्यासाठी कठीण असतात. जर या महिन्यांमध्ये कुठे वेकेन्सी निघालीच तर ती तुम्हाला फायदेशीर असेलच असं नाही. कारण या महिन्यांमध्ये साधारण अनेक कंपन्यांचं हायरिंग प्रोसेस पूर्ण झालेलं असतं. तसंच या महिन्यांमध्ये खूप कमी लोक नोकऱ्या सोडतात किंवा बदलतात. कारण या महिन्यांमध्ये अप्रेजल सायकल असते. ज्याचा भाग प्रत्येक नोकरदाराला व्हायचं असतं.

  ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर

  हे तीन महिने असतात सणांचे. त्यामुळे या महिन्यांमध्ये लोकांना आपलं उत्पन्न स्टेबल असावं असं वाटतं. त्यामुळे कोणी नोकरी सोडण्याचा विचार करत नाही. पण या महिन्यांमध्ये तुम्हाला एखाद्या कंटेंट जनरेट करणाऱ्या कंपनीमध्ये नक्कीच नोकरी मिळू शकते, खासकरून एड मेकिंग आणि रिटर्न मॅटर आऊटसोर्स करणाऱ्या कंपन्यांमध्ये. कारण जास्त मॅटर जनरेट करण्याची या महिन्यांमध्ये गरज अ्सते. त्यामुळे साहजिकच जास्त लोकांची गरज असते.