MPSC च्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदतवाढ; १७ जानेवारीपर्यंत करता येणार अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला अर्ज व शुल्क भरण्यासाठी १३ जानेवारी तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२१ साठी अर्ज व शुल्क करण्यासाठी १५ जानेवारी अंतिम मुदत होती.

    मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२१ या दाेन्ही परीक्षांना अर्ज करण्यास तसेच शुल्क सादर करण्यास १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संकेतस्थळात तांत्रिक बिघाड (Technical Fault) झाल्याने अर्ज भरण्यात येत असलेल्या अडचणीसंदर्भात विद्यार्थ्यांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन एमपीएससीने विद्यार्थ्यांना मुदतवाढत देत दिलासा दिला आहे.

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला अर्ज व शुल्क भरण्यासाठी १३ जानेवारी तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२१ साठी अर्ज व शुल्क करण्यासाठी १५ जानेवारी अंतिम मुदत होती.

    संकेतस्थळावरील तांत्रिक बिघाडामुळे उमेदवारांना अर्ज करण्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी MPSC कडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या दोन्ही परीक्षेंचे अर्ज व शुल्क भरण्यास १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसे परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना १९ जानेवारीपर्यंत चलनाची सुधारित प्रत संकेतस्थळावरून घेता येणार असून, बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.