वरोऱ्यात दारूसाठ्यासह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त; वाहन चालक पसार

वरोरा जिल्हा सीमा बंदी असताना आणि सीमेवर पोलीस तैनात असताना 18 लाख 43 हजार रुपयांपेक्षाही अधिकचा विदेशी दारूसाठा घेऊन एक वाहन शनिवारी पहाटे वरोऱ्यात दाखल झाले.

    वरोरा (Warora).  जिल्हा सीमा बंदी असताना आणि सीमेवर पोलीस तैनात असताना 18 लाख 43 हजार रुपयांपेक्षाही अधिकचा विदेशी दारूसाठा घेऊन एक वाहन शनिवारी पहाटे वरोऱ्यात दाखल झाले. या वाहनाला स्थानिक पोलिसांनी पकडण्यात यश मिळवले असून सदर दारूसाठा आणि दारूसाठा तस्करीसाठी वापरलेले वाहन असा 22 लाख 43 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चंद्रपूर जिल्हा दारूबंदी असतांना अवैध मार्गाने तस्करी आणि विक्री अद्याप थांबलेली नाही. अलीकडे लॉकडाऊन असल्याने दारू बॉटलची चढ्या भावाने विक्री होत असल्याचे म्हटले जाते. तसेच जिल्हा सीमा बंदी असतानाही आणि सिमेवर वाहनांची कसून तपासणी केली जात असतानाही काही भ्रष्ट पोलिसांना हाताशी धरून दारू तस्कर आपला गोरखधंदा करीत असल्याची चर्चा आहे. शनिवारी पहाटे याचाच प्रत्यय स्थानिक पोलिसांना आला. दारूसाठा भरलेले विना नंबर प्लेटचे मालवाहू वाहन बोर्डा चौकात पोहोचले होते.

    पहाटे तीनच्या सुमारास या वाहनाला थांबण्याचा इशारा पोलिसांनी दिला असता वाहन काही अंतरावर थांबवून वाहन चालक पसार झाला. दरम्यान पोलिसांनी पंचासमक्ष या वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनांमध्ये 18 लाख 43 हजार 200 रुपयांचा विदेशी दारू बॉटलचा साठा आढळून आला. सदर दारूसाठा आणि चार लाख रुपये किमतीचे वाहन असा 22 लाख 43 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    हा दारू साठा वर्धा जिल्ह्यातील एका दारू तस्करांनी पुरविल्याचा तसेच तो बुटीबोरी येथील एका डीलर कडून घेतला असल्याची चर्चा असून त्या दिशेने पोलीस तपास करीत आहे. लॉक डाऊन मध्ये सर्व दुकाने बंद असताना हा दारू साठा वाहनांमध्ये भरल्या गेलाच कसा असा प्रश्न निर्माण होत असून या वाहनाने जिल्हा सीमा कशी ओलांडली याची चौकशी होणे गरजेचे झाले आहे.