चंद्रपूरमध्ये ५० खाटांचे डी.सी.एच.सी. रुग्णालय उभारा; आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

बल्लारपूर शहर तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागात वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता बल्लारपूर शहरात 50 बेडेड डी.सी.एच.सी. अर्थात डेझीग्‍नेटेड कोविड हेल्थ सेंटर तसेच 150 बेडेड कोविड केअर सेंटर उभारण्याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

    चंद्रपूर (Chandrapur).  बल्लारपूर शहर तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागात वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता बल्लारपूर शहरात 50 बेडेड डी.सी.एच.सी. अर्थात डेझीग्‍नेटेड कोविड हेल्थ सेंटर तसेच 150 बेडेड कोविड केअर सेंटर उभारण्याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

    आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा आणि मुख्याधिकारी विजय सरनाईक यांच्याशी याबाबत चर्चा केली व नगरपरिषदेने याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर करण्याचे निर्देश दिले. वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता बल्लारपूर येथे 50 बेडेड डी.सी.एच.सी. अर्थात डेझीग्‍नेटेड कोविड हेल्थ सेंटर उभारणे गरजेचे आहे. त्यामध्ये 40 ऑक्सिजन बेडस् असावेत, याकरिता लागणार ऑक्सिजनचा पुरवठा नियमित राहण्याकरिता डी.सी.एच.सी. रुग्णालयाच्या ठिकाणी एक ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात यावा असे आ. मुनगंटीवार यांनी निर्देशित केले.

    सदर डी.सी.एच.सी. रुग्णालयातील वैद्यकीय सेवेकरिता जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय चंद्रपूर तथा बल्लारपूर पेपरमिल येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा घेऊन कोरोना रुग्णांच्या सेवेत सदर रुग्णालय तत्काळ कार्यान्वित करावे असे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे बल्लारपूर शहरानजिक जे क्रिडा संकुल उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी 150 बेडेड कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय या चर्चे दरम्‍यान झाला. यासंबंधिचा प्रस्ताव त्वरीत जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी दिले.