एक अनवाणी देवदूत

ही गोष्ट आहे एका डॉक्टरांची. सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर हे रुग्णांचे देवदूत ठरतायत. पण हे डॉक्टर या सर्वांपेक्षा वेगळे ठरतायत, ते त्यांच्या अनोख्या निग्रहामुळे.

सायकलवर टांग टाकून रोज पेशंट शोधत गावोगावी फिरणाऱ्या या डॉक्टरांचं वय आहे ८७ वर्षं. ते होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात ते फिरत असतात.

या वयातही ते रोज १० किलोमीटर सायकल चालवून गावोगावी जातात आणि गावात कुणी रुग्ण आहे का, हे तपासतात. त्यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची आहे की पायात घालायला चप्पल घेणंसुद्धा त्यांना परवडत नाही. त्यामुळं दररोज रुग्णांच्या सेवेसाठी ते अनवाणीच बाहेर पडतात.

वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन ते घरोघर भेटी देतात. कुणाच्या घरी, कुठल्या रुग्णाला काय झालंय, याची विचारपूस करून त्याला त्यावर उपचार करतात. आजारातून पूर्ण बरं होण्यासाठी काय करायला हवं, याचं मार्गदर्शन करतात.

गेल्या ६० वर्षांपासून ते अविरत हे कार्य करतायत. वयाच्या पंचविशीत त्यांनी घेतलेला रुग्णसेवेचा वसा आजही ते तितक्याच निष्ठेनं जोपासतायत. त्यांच्या सर्टिफिकेटवर छापलेलं डॉ. दांडेकर हे नाव आता धूसर झालंय. मात्र रुग्णांच्या मनातील त्यांची देवदूत प्रतिमा ही दिवसेंदिवस उजळत गेलीय.

त्यांच्या या निस्वार्थी रुग्णसेवेला गावोगावाचे पेशंट मनोमन सलाम करतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.