ग्राहकांना हप्ते पाडून बिल भरण्याची सवलत द्या; आ .सुधीर मुनगंटीवार यांची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी

बीपीएल रेशनकार्ड धारकांना थकित वीज बिलाचे 18 हप्ते पाडून 18 महिन्यात वीजबिलाचा भरणा करण्याची सवलत द्यावी अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.

    चंद्रपूर (Chandrapur).  बीपीएल रेशनकार्ड धारकांना थकित वीज बिलाचे 18 हप्ते पाडून 18 महिन्यात वीजबिलाचा भरणा करण्याची सवलत द्यावी अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे. दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका धारकांना थकित वीजबिलाचे 18 महिन्यांचे 18 हप्ते पाडून वीज बिलाचा भरणा करण्याची सवलत देण्यात यावी तसेच नियमित वीजबिल भरणा यांना कोणतेही व्याज तसेच दंड आकारण्यात येऊ नये, अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

    लॉकडाऊनच्या कालावधीतील थकित विजबिलापोटी गोरगरीब जनतेचे वीज कनेक्शन कापण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महावितरणचे मुख्य अभियंता देशपांडे यांच्यासह विश्रामगृह चंद्रपूर येथे बैठक घेतली. या बैठकीला महावितरणचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष. डॉ.मंगेश गुलवाडे, सुभाष कासनगोट्टूवार, रवी गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

    यावेळी झालेल्या चर्चेत सुधीर मुनगंटीवार यांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दयांवर चर्चा केली. केशरी शिधापत्रिका धारकांना १२ महिन्याचे १२ हप्ते पाडून वीजबिल भरण्याची मुभा देण्यात यावी. वीज कनेक्शन कापण्यापूर्वी 15 दिवसांत 2 वेळा नोटीस पाठविण्यात यावे, महावितरणच्या उपविभागीय कार्यालयामध्ये योजनेची माहिती देण्याकरिता कक्ष तयार करण्यात यावा. 18 मार्च 2021 पासून पूढील 10 दिवस वीजबिल धारकांचे कनेक्शन कापू नये, महावितरणच्या प्रत्येक उपविभागीय कार्यालयामध्ये योजनेच्या माहितीचे होर्डींग्ज लावण्यात यावे, ज्या जिल्ह्यांची वसुली 80 टक्क्यांच्या वर आहे. तेथील विजबिल ग्राहकांचे वीज कनेक्शन कापू नये अशा सूचना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.

    चालू वीज बिलासहीत जुने वीज बिल पेंडींग आहेत त्यांनी एकंदर रकमेच्या 30 टक्के रक्कम भरून उरलेले वीज बिल 12 महिन्यांत समान हप्त्याने 1 टक्का व्याजासह भरावे असे स्पष्टीकरण महावितरणचे मुख्य अभियंता देशपांडे यांनी दिले.