महाराष्ट्र खरच पुरोगामी आहे का? जादुटोणा केल्याच्या संशयावरुन दलित कुटुंबातील 7 जणांना भर चौकात खांबाला बांधून जबर मारहाण

वणी खुर्द या गावातील एक कुटुंब जादुटोणा करत असल्याचा संशय गावकऱ्यांना आला. या संशयातून त्या दलित कुटुंबातील लोकांचे हात पाय बांधून त्यांना जबर मारहाण करण्यात आली.

    चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या वणी खुर्द या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला, वृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेत ७ जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

    अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला कलंकित करणारी ही घटना शनिवारी घडली. या घटनेमध्ये शांताबाई भगवान कांबळे (५३), साहेबराव एकनाथ हुके (४८), धम्मशिला सुधाकर हूके (३८), पंचफुला शिवराज हुके (५५), प्रयागबाई एकनाथ जबर जखमी झाले आहेत.

    यासंदर्भात आम्ही गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, “आता पर्यंत आम्ही 12 जणांवर गुन्हे दाखल करुन त्यांना ताब्यात घेतलं असून या 12 जणांची चौकशी सुरु आहे. आम्ही याचा आणखी तपास करत आहोत.”

    पोलिसांनी काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी या घटनेबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. त्यामुळे, दोन दिवस उलटूनही या गंभीर प्रकाराची कुठेही वाच्यता झाली नाही. मारहाण झालेले कुटुंब दलित असले तरी मारहाण करणाऱ्यांमधे सर्वजातीय सहभाग असल्याचे बोललं जात आहे.

    माध्यम प्रतिनिधी दिपक खेकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या गावाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. गावाबाहेरुन येणाऱ्या व्यक्तिंची चौकशी करुनच त्यांना गावात प्रवेश दिला जात आहे.

    वणी खुर्द या गावातील एक कुटुंब जादुटोणा करत असल्याचा संशय गावकऱ्यांना आला. या संशयातून त्या दलित कुटुंबाला मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी जाऊन त्यांना सोडविले. याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास सुरू आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावकन्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे.