मृतावस्थेत पडलेले स्वप्निल चतारे आणि सेजल चतारे
मृतावस्थेत पडलेले स्वप्निल चतारे आणि सेजल चतारे

  • कटलेला वायर ठरला जीवघेणा

राजुरा (Rajura) :     शेतातील नाल्यावर असलेल्या मोटरपंपच्या वायरमधून विद्युतप्रवाह पाण्यात शिरल्याने पिता आणि चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सिंधी गावात शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. मृतकांमध्ये स्वप्निल सत्यपाल चहारे (३०) आणि सेजल स्वप्निल चहारे (५) यांचा समावेश आहे.

स्वप्नील सत्यपाल चहारे यांचे विरूर स्टेशनला लागून असलेल्या सिंधी रोडजवळील नाल्याला लागून शेत आहे. ते शनिवारी त्यांची मुलगी सेजलसह नाल्यावर पाणी भरायला गेले होते; परंतु मोटारचा वायर कटला असल्याने सेजलला करंट लागला आणि ती जागेवर कोसळली. तिचा जागीच मृत्यू झाला. मुलगी कोसळल्याचे पाहून पिता स्वप्निल तिला वाचविण्यासाठी धावले. मात्र, त्यांनाही करंट लागल्यांने त्यांचाही तेथेच मृत्यू झाला. खूप वेळ झाला तरी पिता आणि मुलगी न परतल्याने स्वप्निलचे वडील सत्यपाल चहारे नाल्याजवळ पोहोचले असता त्यांना स्वप्निल आणि सेजल मृतावस्थेत आढळले. अखेर त्यांनी आरडाओरड करून आसपासच्या शेतातील लोकांना जमा केले. यानंतर पाण्याच्या मोटारीचा विद्युत प्रवाह बंद करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच पीएसआय सदानंद वडतकर, हवालदार दिवाकर पवार, प्रल्हाद जाधव आणि इतर पोलिस टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी शवांचा पंचनामा करून त्यास शवविच्छेदनासाठी पाठविले. या घटनेने सिंधी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.