प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

चंद्रपूर जिल्ह्यातील नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरणाला राज्यातील शेतकरी सकारात्मक प्रतिसाद देत असून आतापर्यंत 5.82 लाख शेतकऱ्यांनी थकीत कृषिपंप वीजबिलापोटी 511 कोटी 26 लाख रुपयांची रक्कम भरली आहे.

    चंद्रपूर (Chandrapur).  नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरणाला राज्यातील शेतकरी सकारात्मक प्रतिसाद देत असून आतापर्यंत 5.82 लाख शेतकऱ्यांनी थकीत कृषिपंप वीजबिलापोटी 511 कोटी 26 लाख रुपयांची रक्कम भरली आहे. कृषी ग्राहकांना सवलतीसह वीजबिल वसुलीसाठी महावितरणमार्फत ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत भरणा करण्यात आलेल्या 511 कोटी 26 लाख रकमेवर 256 कोटी रुपयांची सूट देण्यात आली आहे. एकूण 5 लाख 82 हजार 114 शेतकऱ्यांनी ही थकबाकी भरली आहे.

    राज्यातील 44 लाख 44 हजार कृषिपंप ग्राहकांकडे 45 हजार 785 कोटी रुपयांची थकबाकी असून या नवीन योजनेमुळे एकूण 30 हजार कोटी रुपयांची सूट देण्यात येणार आहे. जनतेला मिळत असलेला प्रतिसाद सतत वाढत असून थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर 2015 पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर 2015 नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार असून महावितरणने घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या सरासरी दराने थकबाकीवर व्याज आकारण्यात येणार आहे.

    वसुलीची ३३ टक्के रक्कम विकासासाठी खर्च
    गावातून वसूल झालेल्या थकबाकीपैकी 33 टक्के रक्कम त्याच गावच्या वीज पुरवठा विषयक पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहे. अधिक गावांचा समावेश असलेल्या सर्कलमध्ये होणाऱ्या थकबाकी वसुलीपैकी 33 टक्के रक्कम त्याच सर्कलच्या वीज पुरवठाविषयक पायाभूत सुविधांवर खर्च करण्याची अतिशय महत्त्वपूर्ण तरतूद या धोरणात आहे. पुढील 3 वर्षात शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीजपुरवठा करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे.