मतदान आटोपले, उमेदवारांच्या धाकधुकीत वाढ

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या २९८ जागेसाठी ७५१ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले असून एकूण १२८ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली.

  • आता मतमोजणीची प्रतीक्षा

चंद्रपूर.  ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत (grampanchayat election) गोंडपिपरी तालुक्यात ४२ ग्रामपंचायतीकरीता १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या २९८ जागेसाठी ७५१ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले असून एकूण १२८ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यात एकूण ५०१३२ मतदार होते. त्यापैकी ४३०८० मतदारांनी मतदान केले असून १९७६७ स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ८५.९३ टक्के मतदान झाले. मतदान आटोपले आणि उमेदवारांच्या धाकधुकित वाढ झाली असून मतदारांनी नेमकी कुणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकली यासाठी उमेदवारांना मत मोजणीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूका अतिशय रंगतदार झाल्या असून अनेक उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर झाल्याचे चित्र अनेक गावात दिसून आले. मुरबी राजकारण्यांना नवख्या उमेदवारांनी चांगलाच घाम फोडला असून एकच पर्व, नवे सर्व हा नारा गावागावात गुंजू लागला होता. अनेक दिवसांपासून उमेदवारांची निवडून येण्यासाठी चांगलीच कसं लागलेली मतदारांनी अनुभवली. काही उमेदवारांना निवडून येण्याचा विश्वास असला तरी काही उमेदवारांची मात्र चांगलीच पंचायत झाली आहे.

निवडणूक एक दिवसापूर्वी चित्र पालटले असल्याने नेमकी कुणाची वर्णी लागेल हे मात्र न सांगता येणारे आहे. विजयाची माळा मतदार कुणाच्या गळ्यात टाकणार हे मात्र, प्रत्यक्ष मतमोजणी नंतरच कळणार आहे. आटोपलेल्या मतदानाची येत्या १८ जानेवारी रोजी मतमोजणी आहे. आता उमेदवारांची धाकधुक सुरू झाली असून उमेदवारांना मतमोजणीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

प्रशासनाचे उत्तम सहकार्य
पार पडलेल्या निवडणुकीत तहसीलदार के. डी.मेश्राम, ठाणेदार संदीप धोबे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात हि निवडणुक शांततेने पार पडली. संपूर्ण प्रशासनाचे कार्य उत्तम राहिले.