महिलांनी पकडलेल्या दारूची होळी; चेक बोरगावात अवैध दारूबंदीसाठी एल्गार

गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील चेक बोरगाव येथे अवैद्य दारू विक्रेत्यांनी हौदोस घातला असून आबालवृद्ध व्यसनाच्या आहारी गेल्याचे चित्र निर्माण होताच गावातील महिलांनी संघटित होऊन अवैद्य दारू विक्री करणाऱ्या विरोधात एल्गार पुकारून समोर दारूविक्री बंद करण्यासाठी कंबर कसली आहे.

  गोंडपिपरी (Gondpipri).  गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील चेक बोरगाव येथे अवैद्य दारू विक्रेत्यांनी हौदोस घातला असून आबालवृद्ध व्यसनाच्या आहारी गेल्याचे चित्र निर्माण होताच गावातील महिलांनी संघटित होऊन अवैद्य दारू विक्री करणाऱ्या विरोधात एल्गार पुकारून समोर दारूविक्री बंद करण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच बुधवारी महिलांनी देशी दारूची एक पेटी पकडून होळी केली तर आज सकाळी दारूविक्री करताना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती आहे.

  तत्पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊन अनेक वर्षे लोटली. यादरम्यान तत्कालीन ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांच्या कारकिर्दीत गोंडपिपरी तालुक्यात दारूबंदीची सोनेरी पहाट उगवली होती. मात्र ठाणेदार बदलताच अवैद्य दारू विक्रेत्यांनी डोके वर काढत संपूर्ण तालुक्याला गवसणी घालत दारू विक्रीचे जाळे विणले. अशातच मूल येथील एका मद्य सम्राटाने गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यात दारूतस्करी करण्याचा यशस्वी प्रयत्न चालविला असून महिन्याकाठी थेट तालुक्यात 2000 देशी दारू पेट्या पुरवठा करण्याचा विडा उचलण्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  यामुळे बनावट व हानिकारक अशा दारूच्या सेवनाने अनेकांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत असताना तसेच आबालवृद्ध व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे व कौटुंबिक वाद निर्माण होत असल्या च्या कारणांमुळे त्रस्त झालेल्या चेक बोरगाव येथील महिलांनी पूर्वी संघटित होऊन गावातील सर्व दारू विक्रेत्यांना दारूविक्री बंद करणार संदर्भात सूचना देऊ केल्या. मात्र, काल रात्रीच्या सुमारास बेवारस रित्या सापडलेली एक पेटी देशी दारू पकडून त्याची होळी केली. तर सकाळच्या सुमारास गावात पुन्हा दारू सापडल्याने ती पकडून थेट पोलिसांना पाचारण करण्यात आले. महिलांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून दुसरीकडे मात्र तालुक्यात अगदी राजरोसपणे अवैद्य दारू विक्री केल्या जात आहे.

  दारू तस्कर सरदार पोलिसांपेक्षाही असरदार
  गेल्या अनेक महिन्यांपासून गोंडपिपरी तालुक्यात प्रचंड प्रमाणात तस्करीतून अवैध देशी दारूचा पुरवठा होत असून पोलिस विभाग मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जनसामान्यांकडून केला जात आहे. तर मूल येथील मद्यसम्राट याच्यावर कारवाई करण्यात अद्यापही अपयशी ठरत आहे.

  म्हणूनच अवैद्य दारूविक्रेते शिरजोर... चेक बोरगाव येथील पोलिस पाटील या मुख्यालयी राहत नसून यामुळे गावातील अवैध धंद्या बाबत माहिती देण्यास असमर्थ ठरत आहे. यामुळे दिवसागणिक अवैध व्यवसायात वाढ होत असून याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. -- रामदास शेंडे, माजी सरपंच, चेक बोरगाव